कोझिकोड (वृत्तसंस्था) धावत्या ट्रेनमध्ये बसण्याच्या वादातून एका अज्ञात प्रवाशाने एक सहप्रवाशी महिलेला जिवंत पेटवून दिल्याची खळबळजनक घटना अलप्पुझा-कन्नूर मेन एक्झिक्युटिव्ह एक्सप्रेसमध्ये घडली. या भयंकर घटनेत महिला आणि एका बालकासह तिघांचा मृत्यू झाला आहे, तर आठ प्रवाशी जखमी झाले आहेत.
कोझिकोडमध्ये रविवारी अलप्पुझा – कन्नूर एक्झिक्युटिव्ह एक्सप्रेसमधील D1 डब्यात रात्री 10 वाजेच्या सुमारास बसण्याच्या जागेवरुन दोन प्रवाशांमध्ये जोरदार भांडण झाले. वाद इतका टोकाला गेला की, एक प्रवाशाने दुसऱ्या सहप्रवाशी महिलेला पेट्रोल ओतून पेटवून दिले. यामुळे भेदरलेल्या काही प्रवाशांनी इमर्जन्सी चेन ओढली. चेन ओढल्यानंतर ट्रेनचा स्पीड कमी झाला. त्यावेळी आरोपीने हीच संधी साधत रेल्वेतून उडी मारून पळ काढला. आरोपीची ओळख पटू शकली नाही.
दरम्यान, या पेटवून दिलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र, ट्रेन ज्यावेळी कन्नूर स्टेशनवर पोहोचली तेव्हा प्रवाशांनी सांगितलं की घटनेनंतर एक महिला आणि एक मुलगा बेपत्ता आहे. त्यानंतर पोलिसांनी दोघांचा शोध सुरु केल्यानंतर तब्बल चार तासांच्या शोध मोहिमेनंतर दोघांचे मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळले. त्यात एक महिला व लहान मुलांचा मृतदेह असून एका अज्ञात पुरुषाचा मृतदेहही पोलिसांना सापडला. मुलाचे वय एक वर्ष असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. तर, आग लागल्याचे पाहून त्यांनी ट्रेनमधून खाली उतरण्याचा प्रयत्न केला असावा किंवा कोणीतरी त्यांना ढकलून दिले असावे, असा पोलिसांना संशय आहे.
जखमी झालेल्या पाच जणांना कोझिकोड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. तर पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे.