मुंबई (वृत्तसंस्था) भारतीय शेअर बाजारात आज पुन्हा एकदा विक्रमी वाढीसह सुरुवात झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सनं आज बाजार सुरू होताच १४० अंकांची झेप घेत ५७ हजारांचा आकडा गाठला आहे. तर निफ्टी देखील १७ हजारांच्या जवळ पोहोचला आहे. निफ्टीची आतापर्यंत सर्वात मोठी वाढ आहे.
अमेरिकेच्या बाजारातून सकारात्मक संकेत, देशातील कोरोना रुग्णांमध्ये झालेली घट आणि वेगाने वाढणारी लसीकरण मोहीत याचे सकारात्मक परिणाम बाजारावर दिसून आले. तसेच ऑटो क्षेत्रातील विक्री आणि वाढता जीडीपी यामुळे शेअर बाजारात उत्साहाचं वातावरण आहे. आज टाटा स्टील, रिलायन्स, व्होडाफोन आयडिया, एअरटेल, मारूती, ईजी ट्रिप प्लानर्स, एलअँडटी आणि एक्सिस बँकेच्या शेअर्सवर नजर असणार आहे. आज बीएसईवर लिस्टेड एएफ इन्टरप्राजेज, एजेल, धरानी शुगर्सस अँड केमिकल्स, इंडियन सूक्रोज, न्यूटाइम इन्फ्रा, ऑप्टो सर्किट्स, सूरतवाला बिझनेस ग्रुप, स्माईलडायरेक्ट क्लब आणि सिधु ट्रेड लिंक्स यांचे आर्थिक परिणाम येणार आहेत.
भारतीय शेअर बाजारात या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच सोमवारी उत्साहाचं वातावरण दिसून आलं होतं. बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टीने विक्रमी स्तर गाठला होता. बीएसई सेन्सेक्स २०५ अंकांच्या तेजीसह सुरु झाला. तेव्हा सेन्सेक्स ५६,३२९.२ होता. त्यानंतर बाजार बंद होताना सेन्सेक्स ८३४ अंकासह ५६,९५८.२७ वर पोहोचला होता. शेवटी सेन्सेक्स ७६५.०४ अंकासह ५६,८८९.७६ अंकांवर बंद झाला. याचबरोबर निफ्टीही सोमवारी ७० अंकांच्या वाढीसह १,७७५.८५ वर सुरु झाला. बाजार बंद होता निफ्टी २२५.८५ अंकांसह १६,९३१.०५ वर बंद झाला होता. दुसरीकडे अमेरिकन शेअर बाजार ३० ऑगस्टला १३६.३९ अंकांसह १५२६५.८९ वर बंद झाला होता. तर युरोपियन बाजारातही उत्साह दिसून आला. फ्रान्सच्या सीएसीत ०.०८ टक्के तर जर्मनीच्या डीएएक्समध्ये ०.२२ टक्क्यांची वाढ दिसून आली.
















