जळगाव (प्रतिनिधी) धरणगाव तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी अवैध गौणखनिज वाहतूक करणारी पकडलेली वाहने परस्पर सोडून दिल्याचा गंभीर आरोप करत थेट विभागीय आयुक्तांकडे एकाने तक्रार दाखल केली आहे. दरम्यान,धरणगाव तहसीलदारांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
महेंद्र प्रकाश कोळी यांनी आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्या आधीही बाबतीत कळविले आहे. परंतू त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही होत नाही. धरणगाव येथे पदावर आल्यापासून देवरे यांनी खुप वेळा अवैध गौणखनिज वाहतूक करीत असतांना मंडळ अधिकारी, तलाठी यांनी पकडलेले वाहने परस्पर सोडली आहेत. तसेच शासनाच्या तिजोरीत पैसे न भरता शासनाचा पगार घेऊन शासनाची दिशाभूल करीत आहे.
मी केलेल्या तक्रारीवर खोटे बोलून वरिष्ठ अधिकाऱ्याची दिशाभूल करीत आहे. त्यांनी ट्रॅक्टर (क्र. MH 19 C 7911) ट्रॉली (क्र. MH 19 Z 3040) हे वाहन सोडले असल्याचा आरोपही तक्रारदार महेंद्र कोळी यांनी केला आहे. तसेच देवरे यांनी या अगोदर दि. १२ डिसेंबर २०१९ रोजी मंडळ अधिकारी पाळधी अशोक पुंडलिक सोनवणे, तलाठी बांभोरी प्र.चा. अविनाश पांडुरंग पाटील, तलाठी पाळधी खुर्द. प्रशांत दिनकर पाटील यांनी ट्रक (क्र. MH 18 E 7372) हे २ ब्रास रेतीचे वाहन पकडले होते. परंतू, तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी हे वाहन सुध्दा परस्पर सोडलेले आहे. व शासनाचे नुकसान केलेले आहे. असे कित्येक वाहने त्यांनी सोडली आहे. ते आपल्या पदाचा दुरुपयोग करीत खुप भ्रष्टाचार केल्याचे दिसून येत असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. तरी श्री देवरे यांना निलंबित करून त्यांची चौकशी करावी. शासनाच्या तिजोरीत पैसे न भरल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी देखील तक्रार महेंद्र कोळी यांनी केली आहे.
– अर्ज पूर्णतः चुकीचा असून सदर वाहन आज रोजी तहसिलला उभे आहे. याबाबत खुलासा जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केला आहे. नितीनकुमार देवरे (तहसीलदार धरणगाव)