पुणे (वृत्तसंस्था) एकिकडे कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसीबाबत सकारात्मक प्रतिक्रिया येत असतानाच तिथं विरोधी पक्षांनी मात्र या लसीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्हं उभं केलं. तिसऱ्या ट्प्प्यातील चाचण्यांच्या अहवालाशिवाय लसीला मान्यता देण्यात आल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. याचबाबत सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी लसीच्या सुरक्षिततेची पूर्ण हमी दिली.
ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) रविवारी कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसींच्या आपातकालीन वापरासाठी परवानगी दिली. या मोठ्या घोषणेनंतर संपूर्ण देशालाच एक मोठा दिलासा मिळाला. भारतात कोरोना प्रतिबंधक लसींच्या आपातकालीन वापरासाठी मान्यता मिळताच जागतिक स्तरावरून या निर्णयाचे स्वागत झाले. देशातही पंतप्रधानांसह अनेक नेतेमंडळींनीही या निर्णयाचे स्वागत केले. जागतिक आरोग्य संघटनेकडूनही कोरोनाशी लढण्यासाठी उचलण्यात आलेल्या या पावलाचे कौतुक झाले. लस घेतल्यानंतर होणाऱ्या काही परिणामांबाबत सांगताना, हलकी डोकेदुखी, किंवा किरकोळ ताप जाणवू शकतो. पण, अशा वेळी पॅरासिटामोलच्या गोळीनं परिस्थिती नियंत्रणात येईल, त्यासाठी चिंता करण्यातं किंवा गोंधळण्याचं कारण नाही हा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला. लसीच्या पहिल्या मात्रेनंतर अर्थात पहिल्या डोसनंतर नेमकी कोणती काळजी घ्यावी याबाबत सांगताना ते म्हणाले, लसीची पहिली मात्रा किंवा पूर्ण डोस घेतल्यानंतरही मास्कचा वापर हा बंधनकारकच आहे. कारण, लस घेतल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग नाकारता येत नाही. कारण, ही लस काही बुलेटप्रूफ नाही. त्यामुळं सावधगिरी म्हणून मास्कचा वापर हा झालाच पाहिजे.