सातपूर : श्रमिकनगर येथील एका मटनाच्या दुकानातून अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी (दि. २) मध्यरात्री ते पहाटेदरम्यान सात बोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
सातमाउली चौक येथे फिरोज मटन शॉप आहे. दुकान मालक फिरोज मन्सुरी यांनी रात्री दुकान बंद करताना ३० बोकड लोखंडी पिंजऱ्यात बंद करून ठेवले होते. अज्ञात चोरट्याने मध्यरात्री ते पहाटेदरम्यान पिंजऱ्याचे कुलूप तोडले. त्यामुळे दरवाजा अचानक उघडल्याने बोकडांनी पळ काढला. सकाळी हा प्रकार समजल्यावर मालकाने परिसरातून काही बोकड जमा केले. मात्र, सात बोकड चोरी गेल्याचे मालकाच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपास सुरू आहे. गेल्या काही दिवसांतील हा तिसरा प्रकार असल्यामुळे मांस विक्री करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबतचे वृत्त आज ‘पुण्य नगरी’ने दिले आहे.