मुंबई (वृत्तसंस्था) केंद्रातील मोदी सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाबाबत मोठा निर्णय घेतलाय. शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने शक्तीकांत दास यांच्या फेरनियुक्तीला मंजुरी दिलीय. त्यामुळे शक्तीकांत दास पुढील आणखी ३ वर्षे आरबीआयच्या गव्हर्नरपदी कायम राहणार आहेत.
शक्तीकांत दास याआधी अर्थमंत्रालयात आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव होते. त्यानंतर त्यांची ११ डिसेंबर २०१८ रोजी आरबीआयच्या गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांचा हाच ३ वर्षांचा कार्यकाळ १० डिसेंबर २०२१ रोजी संपत आहे. मात्र, या फेरनिुयक्तीने ते डिसेंबर २०२४ पर्यंत या पदावर काम करतील. शक्तिकांत दास यांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्रनरपदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वी वित्त मंत्रालयाचे सचिव म्हणून कामकाज पाहिले होते. उर्जित पटेल गव्हर्नरपदावरुन पायउतार झाल्यानंतर ११ डिसेंबर २०१८ रोजी शक्तिकांत दास यांच्याकडे रिझर्व्ह बँकेची सूत्रे सोपवण्यात आली होती. शक्तिकांत दास यांना वित्त, कर, उद्योग या क्षेत्रातील कामाचा व्यापक अनुभव आहे. त्यांनी विविध राज्यांमध्येही सरकारी पदावर काम केले आहे. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदी लागू करण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीसंदर्भात अभ्यास करण्यासाठी जी टीम तयार केली होती, त्यातील शक्तिकांत दास हे महत्त्वाचे अधिकारी होते. नोटाबंदीनंतर लहान-मोठे बदल, घोषणाही शक्तिकांत दास हेच करत असत. नोटाबंदी नेमकी काय आहे, हेही जनतेला माध्यमांमधून दास यांनीच समजावून सांगितले होते.
कोण आहेत शक्तिकांत दास ?
२६ फेब्रुवारी १९५७ रोजी ओडिसामध्ये जन्मलेले शक्तिकांत दास हे १९८० च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ३५ वर्षांच्या भारतीय प्रशासकीय सेवेत त्यांनी टॅक्स, इंडस्ट्री आणि आर्थिक विषयाशी संबंधित विभागांमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांच्याकडे रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची सूत्रे सोपवण्यात आली होती.