जळगाव (प्रतिनिधी) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धरणगाव तालुक्यातील महिलेवर टॉन्सिल्सची शस्त्रक्रिया करण्यास नकार दिल्याने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी अधिष्ठाता मिलिंद फुलपाटील यांना चांगलेच सुनावले. आमदारांना फोन लावायला सांगता. तुम्ही आमचे बॉस आहात काय? डीनसाहेब, नीट वागा नाही तर वेगळी स्टाइल दाखवू का? अशा शब्दात पालकमंत्र्यांनी सुनावले असून अधिष्ठात्यांना इशाराही दिला आहे.
जिल्हा नियोजन भवनात शुक्रवारी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्रलंबित असलेल्या कामांबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आढावा घेतला. धरणगाव तालुक्यातील महिलेवर टॉन्सिल्सची शस्त्रक्रिया करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले होते. तेथे टॉन्सिल्सची शस्त्रक्रिया होणार नसल्याचे सांगून त्यांना माघारी परतवण्यात आले. त्यामुळे त्या महिलेला खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करावी लागली असल्याचे पालकमंत्री ना. पाटील यांना सांगितले. तुम्ही गरिबी पाहिली नाही का? जीएमसीत लोकप्रतिनिधी त्यांच्या नातेवाईकांना पाठवत नाहीत. लोकप्रतिनिधींनी त्यांच्या खर्चातून रुग्णसेवेसाठी रुग्णवाहिका दिल्या आहेत. रुग्णसेवेसाठी पगारी आरोग्यदूत नेमले आहेत. तुमच्यापेक्षा आम्ही चांगली रुग्णसेवा करीत आहोत. राजकीय पक्षांचे पदाधिकारी, पत्रकार व आरोग्यदूत यांना अधिष्ठात्यांकडून चुकीची वागणूक देण्यात येत असल्याबाबत त्यांनी संताप व्यक्त केला. पालकमंत्री, जिल्हाधिकारी जनतेच्या, पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देतात. तुम्ही काय आमचे बॉस आहात काय? अधिष्ठातापदाचे काम पेलवत नसेल तर साइड पोस्ट घ्या. पालकमंत्री असल्याने काही मर्यादा आहेत. नाही तर वेगळ्या स्टाइलने तुम्हाला दाखवून देऊ, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी आमदार किशोर पाटील यांनीही अधिष्ठात्यांच्या कामावर नाराजी व्यक्त केली.