सोलापूर (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्यावतीने डी. लिट (डॉक्टर ऑफ लिटरेचर) ही पदवी जाहीर केली आहे. या मानद पदवीने सन्मानित करण्याबाबतचा प्रस्ताव प्रयास मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेने व्यवस्थापन परिषदेत ठेवला होता. अधिसभेच्या १५ मार्च रोजी झालेल्या २३ व्या बैठकीत त्याला मंजुरी देण्यात आली.
सोलापूर विद्यापीठातर्फे देण्यात येणारी ही दुसरी डी. लिट. पदवी आहे. शरद पवारांना डी. लिट. या मानद पदवीने सन्मानित करण्याबाबतचा प्रस्ताव प्रयास मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेने व्यवस्थापन परिषदेत ठेवला होता. या प्रस्तावास सीनेट सदस्य सचिन गायकवाड हे सूचक आणि सीनेट सदस्य राजा सरवदे हे अनुमोदक होते. अधिसभेच्या १५ मार्च रोजी झालेल्या २३ व्या बैठकीत त्याला मंजुरी देण्यात आली. त्यास सभागृहात अधिसभेने बहुमताने मान्यता दिली.
महाराष्ट्र तसेच देशाचे राजकारण, प्रशासन, समाजकारण, क्रीडा, साहित्य, संस्कृती अशा सर्वच क्षेत्रात शरद पवार यांचे कार्य प्रत्येकाला प्रेरणादायी अन् अभिमान वाटावा असे आहे. या देशातील युवकांसाठी त्यांचे जीवन हे मार्गदर्शक ठरणारे आहे. म्हणून प्रयास मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेने माजी केंद्रीय कृषीमंत्री तथा राज्यसभा सदस्य शरद पवार यांना डी. लिट. पदवी देऊन विद्यापीठाच्यावतीने गौरव करण्यात यावा, याकरिता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ प्रशासनास समक्ष भेटून मागणी केली होती, असे नमूद करत या निणर्याबद्दल कुलगुरू, कुलसचिव आणि सीनेट सदस्य यांचे आभार मानतो असे प्रयास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन शिंदे यांनी सांगितले.
















