मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात कोरोना विषाणू संसर्गाची लाट आली आहे. राज्यात दररोज ६० हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. राज्याला ऑक्सिजनचा सर्वाधिक तुटवड्याला सामोरं जावं लागत आहे. ऑक्सिजन तुटवड्यावर मार्ग काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि वसंतदादा शुगर इन्स्टिटूटचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मिती आणि पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून राज्यातील साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मिती करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून साखर कारखान्यांना पत्र लिहिलं आहे. राज्यातील सहकारी आणि खाजगी १९० कारखान्यांना पत्र पाठवण्यात आलेय. शिवाय जे कारखाने बंद आहेत त्यांनी ऑक्सिजन किट खरेदी करून रुग्णालयांना पुरवावे, असंही आवाहन करण्यात आलेलं आहे. शरद पवारांच्या सूचनेनुसार साखर कारखान्यांना पत्र पाठवण्यात आली आहेत.
सध्याच्या कोरोना परिस्थितीत ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. त्यामुळं सर्व साखर कारखान्यांनी पुढाकार घेऊन ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभे करावे, असं पत्रात म्हटलं आहे.