मुंबई (वृत्तसंस्था) गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधक यांच्या वादात मेट्रो कारशेडचा प्रकल्प प्रलंबित आहे. मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात या विषयावर चर्चा झाली आहे. परिणामी या प्रकरणाची गुंता दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मध्यस्थी करणार असल्याची माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
कांजूर कारशेडच्या मुद्द्यावरुन सध्या विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली असल्याचे पाहायला मिळत आहे. कारशेडच्या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “मेट्रोसाठी आपल्याला स्टेंबलिंग लाईनची आपल्याला आवश्यकता आहे. पहिल्या प्रकल्पात स्टेंबलिंग लाईनचा प्रस्ताव नव्हता हे पाहून मला धक्का बसला. आरेमध्ये पर्यावरण वाचवलं. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची व्याप्तीही वाढवली. कांजूरमार्गला ४० हेक्टर जागा मिळली होती. कांजूरमार्गची जागा ओसाड आहे. कांजूरमार्गला मेट्रोच्या ३, ४ आणि ६ या मार्गिकेचे कारशेड करता येणार होते. यात एक मोठा फरक आहे. जिकडे एका मार्गिकेसाठी कारशेड होणार होतं तिथे इतर लाईनसाठीही कारशेड करता येणार आहे. केवळ एका लाईनसाठी आरेमध्ये प्रकल्प कशासाठी?” या वादात केंद्रानेही उडी घेत कांजूरमार्ग येथे होणाऱ्या प्रस्तावित मेट्रो कारशेडला विरोध करत न्यायालयाचे दार ठोठावले आहे.
पवार म्हणाले याबद्दल कुठे तरी एकोपा निर्माण करायला पाहिजे. मुख्यमंत्री म्हणाले जर वाद सोडून यावर मार्ग निघाला तर बघायला हवा. याबाबत शरद पवार प्रयत्न करत आहेत. गरज पडली तर एकदोन दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी देखील ते चर्चा करतील. मुंबईच्या विकासात अडथळा नको यासाठी मुख्यमंत्री देखील प्रयत्न करत असून यात पवार मध्यस्थी करत असल्याची माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. आधीपासून आमची भूमिका सामंजस्याची आहे. पण काही लोक यात राजकारण करत आहेत. म्हणून पवार साहेब यात मध्यस्थी करत असल्याचे ते म्हणाले.