नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एक एप्रिलपासून ४५ वर्षांपूर्वी सर्व नागरिकांना कोरोनाची लस देण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्रीय कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
येत्या एक एप्रिलपासून ४५ वर्ष वयोगटावरील प्रत्येकाला कोरोनाची लस मिळणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात घोषणा केली. ४५ वर्षांवरील प्रत्येकाने लसीकरणासाठी नोंदणी करावी, असं आवाहन जावडेकरांनी केलं. आतापर्यंत केवळ सहव्याधी असलेल्या ४५ वर्षांवरील व्यक्तींनाच कोरोना लस दिली जात होती. वयाची ६० वर्षे पूर्ण केलेल्या सर्व व्यक्तींचे सध्या लसीकरण करण्यात येत आहे. ४५ ते ५९ या वयोगटातील सहव्याधी असलेल्या व्यक्तींचेही तूर्तास लसीकरण सुरु आहे. या दोन्ही वयोगटांतील व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी १ जानेवारी २०२० रोजीचे वय विचारात घेतले जात आहे. यानुसार आज ज्यांचे वय ५९ वर्षे ३ महिने किंवा सहव्याधी असणाऱ्या गटातील व्यक्तीचे वय ४४ वर्षे ३ महिने असले तरीही त्यांची लसीकरणासाठी नोंदणी करणे व नंतर लसीकरण करणे शक्य आहे.
मुंबईत सध्या सुरु असणारी कोरोना लसीकरण केंद्रे ही ८ ते १२ तास या कालावधीसाठी कार्यरत आहेत. ती २४ तास कार्यरत झाल्यास दिवसाला एक लाख व्यक्तींचे लसीकरण करणे सहज शक्य होईल, असा विश्वास मुंबई महापालिकेने व्यक्त केला आहे. आणखी २९ रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्रे सुरु करण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेद्वारे यापूर्वीच शासनाकडे पाठवण्यात आला आहे. खासगी रुग्णालयातील कोविड लसीकरण केंद्रे २४ तास सुरु ठेवण्यास नुकतीच मुभा मिळाली आहे.