मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील संबंधित प्रकरणाच्या चौकशीत जे काही सत्य बाहेर येईल, जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असं स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सचिन वाझे यांच्या अटकेवर बोलण्यास टाळलं आहे. माध्यमांनी सचिन वाझे यांच्या अटकेवर प्रश्न विचारला असता, ‘मी या प्रकरणी काही सांगू शकत नाही’ अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.
मुंबईत स्फोटकांनी कार सापडलेल्या प्रकरणात मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी भाजपने महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. बारामतीमध्ये पत्रकारांशी बोलत असताना शरद पवार यांनी पश्चिम बंगाल निवडणुका आणि राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्यावर आपले मत मांडले. यावेळी पत्रकारांनी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली, याबद्दल प्रतिक्रिया जाणून घेतली असता पवार म्हणाले की, ‘या प्रकरणी मी काही सांगू शकत नाही’ अशी प्रतिक्रिया दिली.
‘राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा अजूनही प्रलंबित आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात लोकशाहीची आणि घटनेत असणारी जबाबदारी न पाळणारा राज्यपाल कधी महाराष्ट्राने पहिला नाही’, असं म्हणत शरद पवार यांनी राज्यपालांवर निशाणा साधला. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजप सत्तेचा गैरवापर करीत आहे. एक वाघिणी आपल्या राज्यातील लोकांसाठी संघर्ष करीत आहेत. तिच्यावर सगळे हल्ला करीत आहे. बंगालचे लोक स्वाभिमानी आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली सरकार येईल याची मला खात्री आहे, असा दावाही शरद पवारांनी केला. ‘केरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सोबत डावे पक्ष आमच्या सोबत आहेत. त्यामुळे तिथे आम्हाला स्पष्ट बहुमत मिळेल’, असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.
‘5 पैकी एका राज्यात भाजपची सत्ता येईल अन्य ठिकाणी भाजप सोडून इतर पक्ष सत्तेवर येतील. हा ट्रेन्ड देशाला नवी दिशा देणारा ठरेल’, असंही शरद पवार म्हणाले. ‘बेजबाबदारपणे बोलणे काही लोकांचं वैशिष्ट्य असते. शेतकऱ्यांना खलिस्तानी बोलत असतील तर त्यांच्यावर न बोलणं बरं’, असं म्हणत शरद पवार यांनी भाजपचे खासदार साक्षी महाराज यांच्यावर टीका केली.
सत्य समोर आल्यानंतर योग्य ती कारवाई – गृहमंत्री
दरम्यान, ‘दक्षिण मुंबईत स्कॉर्पिओ गाडीत ज्या जिलेटीन कांड्या सापडल्या याचा व मनसुख हिरेन हत्याकांड या दोन्हीचा तपास एटीएस व एनआयए करत आहे. या तपासात जे सत्य पुढे येईल त्यानुसार, योग्य कारवाई केंद्र सरकार व राज्य सरकारकडून केली जाईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
सचिन वाझेंना केल्यानंतर भाजपा आणखीनच आक्रमक झाला आहे. या कटात सहभागी असलेल्या लोकांची नावे समोर येण्यासाठी सचिन वाझे यांची नार्को टेस्ट केली जावी, अशी मागणी भाजपाचे नेते राम कदम यांनी केली आहे. कर नाही त्याला डर कशाला पाहिजे. त्यामुळे सचिन वाझे यांची नार्को टेस्ट करून दूध का दूध पानी का पानी होऊ जाऊ दे. सचिन वाझे यांची नार्को टेस्ट झाली नाही तर ठाकरे सरकारचा खरा चेहरा लोकांसमोर येईल, असं राम कदम यांनी म्हटलं आहे.