मुंबई (वृत्तसंस्था) शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी (Indrani Mukherjea) जामीन मिळाल्यानंतर साडेसहा वर्षांनंतर आज, शुक्रवारी तुरुंगातून बाहेर आली. जामीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तिची सुटका झाली.
शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि शीनाची आई इंद्राणी मुखर्जीला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर तिच्या जामिनाच्या अटी सीबीआय न्यायालयाने गुरुवारी निश्चित केल्या. त्यानुसार इंद्राणीची दोन लाख रुपयांच्या जातमुचल्यावर सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. गेल्या साडेसहा वर्षांपासून इंद्राणी कारागृहात होती. सत्र आणि उच्च न्यायालयाने सात वेळा तिला जामीन नाकारला होता. परंतु तिने कारागृहात काढलेल्या कालावधीची, नजीकच्या काळात तिच्यावर चालवण्यात येणारा खटला संपण्याची चिन्हे नसल्याची आणि अन्य आरोपींना जामीन मिळाल्याची बाब लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी इंद्राणीला जामीन मंजूर केला होता.
सर्वोच्च न्यायालयाचा आदेश काय?
दोन लाख रुपयांचा जातमुचलका आणि तेवढय़ाच किंमतीच्या हमीवर इंद्राणीची भायखळा महिला कारागृहातून सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. हमीदार हजर करण्यासाठी न्यायालयाने इंद्राणीला दोन आठवडय़ांची मुदत दिली आहे. याशिवाय जामिनावर बाहेर असताना तिने पुरावे नष्ट करू नये, साक्षीदारांना प्रभावित करू नये, तसेच जामिनावरील आरोपींशी संपर्क साधू नये, असेही न्यायालयाने तिची जामिनावर सुटका करण्याचे आदेश देताना स्पष्ट केले.
प्रकरण काय?
शीना बोराची २०१२ मध्ये हत्या झाली होती. परंतु हे हत्याकांड २०१५ मध्ये उघडकीस आले होते. इंद्राणीचा चालक श्याम राय याला पिस्तूल बाळगल्याच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केली. त्या प्रकरणाची चौकशी सुरू असताना शीना बोरा हत्याकांड उघडकीस आले. न्यायालयाचा आदेश.. इंद्राणीवर सुरू असलेल्या खटल्यात काही साक्षी नोंदवण्यात आल्या असल्या तरी खटला बराच काळ चालू शकतो. शिवाय हे संपूर्ण प्रकरण केवळ परिस्थितीजन्य पुराव्यावर अवलंबून आहे. त्यामुळे हा खटला लवकर संपणार नाही. प्रदीर्घ काळ तुरुंगात घालवल्यानंतर संशयित आरोपीला जामिनाचा हक्क असतो, असे आमचे मत आहे. त्यामुळे आम्ही इंद्राणीला सशर्त जामीन मंजूर करत असल्याचे न्यायालयाने आदेशात म्हटले.