मुंबई (वृत्तसंस्था) अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योजक राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. पॉर्न फिल्म्सची निर्मिती करून काही मोबाइल अॅपवर या फिल्म प्रदर्शित केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात राज कुंद्रा यांना अटक करण्यात आल्याची माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली आहे.
मुंबई पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी अश्लील चित्रपटांची निर्मिती करून अॅप्सवर प्रदर्शित करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. याच प्रकरणात राज कु्ंद्रा यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. सात ते आठ तास त्यांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी कुंद्राला अटक केली. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी या प्रकरणाची माहिती दिली.
फेब्रुवारी महिन्यात पोलिसांनी कारवाई केली होती. पॉर्न अॅप्स प्रकरणी त्यावेळी गुन्हाही दाखल झाला होता. या प्रकरणात राज कुंद्रा मुख्य सूत्रधार असल्याचं दिसत आहे. यासंदर्भात त्याच्याविरुद्ध पोलिसांकडे पुरेसे पुरावे असल्याची माहिती पोलीस आयुक्त नगराळे यांनी दिली आहे. मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलनं कुंद्राला चौकशीसाठी बोलावलं होतं.
फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांच्या एका पथकाने मढ येथील ग्रीन पार्क बंगलोवर धाड टाकली होती. याठिकाणी पॉर्नोग्राफिक शुटिंग होत असल्याच्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. तर एका मुलीची सुटका केली होती. अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये दोन अभिनेत्यांचा, तर दोन तरुणींचा समावेश आहे.
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांकडून चित्रपट बनवणाऱ्या अनेकांची चौकशी करण्यात आली होती. काल (१९ जुलै) कुंद्राला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. सुमारे ७ ते ८ तास त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी राज कुंद्राला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. कुंद्राला आज (२० जुलै) न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे. राज कुंद्राविरोधात पुरेसे पुरावे असल्यामुळे अटक करण्यात आली आहे.
















