शिंदखेडा (प्रतिनिधी) शेत जमिनीच्या खातेफोडसाठी नायब तहसिलदारांसह इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नावाने १४ हजार रुपयांची लाच स्वीकारतांना येथील तहसिल कार्यालयातील खाजगी पंटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. रितेश अरुण पवार, असे संशयिताचे नाव आहे.
डांगुर्णे ता.शिंदखेडा येथील रहिवासी असलेले तक्रारदार यांच्या मालकीची ३ सहधारकांसह डांगुर्णे शिवारात शेतजमीन आहे. तहसिल कार्यालयात अर्ज करण्याकरीता कागदपत्र घेऊन आले असता कार्यालयाजवळ खाजगी पंटर रितेश अरुण पवार हा भेटला. त्याने खातेफोड करुन देईल, असे सांगून तक्रारदार व सहधारक यांना दि.४ आक्टोंबर रोजी तहसिल कार्यालयात बोलावून खातेफोड प्रकरणाचे कामकाज करुन दिले तसेच कार्यालयातील नायब तहसीलदार, अधिकारी व कर्मचारी यांच्याशी माझे घनिष्ठ संबंध आहेत असे सांगून खातेफोडचा आदेश काढण्यासाठी नायब तहसीलदार, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नावाने २० हजार रुपये लाचेची मागणी केली.
याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे कार्यालयात तक्रार करण्यात आली. तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीने दि. ६ आक्टोंबर रोजी तहसील कार्यालयात पडताळणी केली असता तडजोडीअंती रितेश पवार याने १४ हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर काल (दि. १०) एसीबीच्या पथकाने तहसिल कार्यालयात सापळा लावून रितेश पवार यास १४ हजार रुपयांची लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात रितेश पवार . विरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन १९८८ चे कलम ७ अ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते.
ही कारवाई उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, हेमंत बेंडाळे, रुपाली खांडवी, राजन कदम, मुकेश आहीरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, प्रशांत बागुल, गायत्री पाटील, रामदास बारेला, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांच्या पथकाने केली आहे.