धरणगाव (प्रतिनिधी) तुमचे तांबे-पितळ, चांदी-सोने चमकवून देतो, अशी थाप मारत दोन भामट्यांनी धरणगावात दोन महिलांना गंडवल्याची खळबळजनक घटना ७ मे रोजी सकाळच्या सुमारास घडली.
या संदर्भात अधिक असे की, काळ्या रंगाच्या मोटार सायकलवर मातोश्री नगर परिसरात सकाळी ११ वाजेच्या सुमारास दोन भामटे आले. त्यांनी स्वाती रामदास रोकडे आणि इंदूबाई हरी सोनवणे या दोघं महिलांना तुमचे तांबे-पितळ, चांदी-सोने चमकवून देतो, अशी थाप मारत विश्वासात घेतले. त्यानंतर स्वाती रोकडे यांच्याकडून १६ हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत तर इंदुबाई सोनवणे यांच्याकडून १६ हजार किंमतीचे कानातील सोन्याचे कर्णफुल तसेच २४ हजाराचे गळयातील सोन्याची पोत असा एकूण ५६ हजाराचा ऐवज चमकवून देण्याच्या नावाने घेतले. परंतू हात चलाखी करत दागिने परत न देता घटनास्थळावरून पोबारा केला. या प्रकरणी स्वाती रोकडे यांच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. प्रमोद पाटील हे करीत आहेत.