मुक्ताईनगर (प्रतिनिधी) शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानात मुक्ताईनगरात जाहीर सभा झाली. यावेळी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी खंत व्यक्त केलीय. शिवसेनेचे तालुकाप्रमुख, विधानसभा क्षेत्र प्रमुख यांच्याविरुद्ध धादांत खोटे गुन्हे दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री आमचे असतांना देखील आमच्यावर ही परिस्थिती आली आहे. अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
यावेळी हातकणंगले (जि. कोल्हापूर) येथील खासदार धैर्यशील माने यांची उपस्थिती होती. त्यावेळी आमदार पाटील बोलत होते. आमदार पाटील म्हणाले की, गुन्हे दाखल होत असले तरी आम्ही निधड्या छातीचे आहोत. जर गुन्हा केला असेल तर निश्चित सांगा गुन्हा करून लपून राहणाऱ्यांपैकी आम्ही नाही. आमचीपण वेळ येईल आणि प्रत्येक विषयाला उत्तर देण्यात येईल, केसेसला आम्ही घाबरत नाही, असा टोलाही आमदार पाटील यांनी कुणाचेही नाव घेता लगावला.
खासदार माने म्हणाले की, जिल्ह्यात ११ पैकी पाच आमदार हे सेनेचे आहेत. लवकरच अकराही मतदारसंघांत शिवसेनेचे आमदार निवडून येतील. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख विलास पारकर, गजानन मालपुरे प्रा. उत्तम सुरवाडे, गजानन खोडके, सुनील पाटील, पंकज राणे, अफसर खान, बोदवडचे नगराध्यक्ष आनंदा पाटील, हाजी सईद बागवान, नवनीत पाटील, पंकज कोळी, प्रफुल्ल पाटील, छोटू पाटील, सूरज परदेशी है प्रमुख व्यासपीठावर उपस्थित होते. सूत्रसंचालन पंकज पांडव यांनी केले. आभार प्रवीण चौधरी यांनी मानले.