जळगाव (प्रतिनिधी) ‘शिवसेना पक्ष हा स्वर्गीय बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. आम्ही गुपचूप काही करत नाही, जे करतो ते समोर करतो, असा खोचक टोला शिवसेनेचे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंवर (Eknath Khadse) यांना लगावला आहे.
बोदवड नगरपंचायतीच्या निकालानंतर माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी या निवडणुकीत भाजप व शिवसेनेची छुपी युती असल्याचा आरोप केला होता. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीची ऑनलाइन बैठक पार पडली. या बैठकीनंतर पाटील पत्रकारांशी बोलत होते.
स्थानिक स्वराज्य संस्थेची ही निवडणूक होती. त्या निवडणुकांमध्ये कोणत्याही राजकीय पक्षांसोबत युती करण्याची आम्हाला संधी होती. मात्र, आम्ही सर्व १७ जागांवर उमेदवार दिले. शिवसेना जे काही करते, ते समोरासमोर करत असते. आम्ही गुपचूप काहीच करत नाही. आम्ही खुलेपणाने बोदवडची बाजी मारली असल्याचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
त्यांनी सांगितले की, बोदवडकरांनी शिवसेनेवर विश्वास दाखवला असून, राज्यात असलेल्या सत्तेच्या माध्यमातून बोदवडकरांचा विकास करण्याचा आमचा प्रयत्न राहिल. बोदवडमध्ये मैदान मारणे सोपे नव्हते. मात्र, शिवसेनेने या ठिकाणी स्पष्ट बहुमत मिळवले आहे. बोदवडकरांना परिवर्तनाची गरज होती व ते परिवर्तन त्यांनी करून दाखवले आहे. काही जणांकडून या निवडणुकीत कमी मतांनी पराभव झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, शिवसेनेच्यादेखील काही जागा कमी मतांनी पराभूत झाल्या हेदेखील मान्य करावे लागेल असे ते म्हणाले.