मुंबई (वृत्तसंस्था) एका महिला मानसोपचार तज्ज्ञाने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर काही गंभीर आरोप केल्याचा प्रकार समोर आला आहे. संजय राऊत यांच्यावर विविध आरोप करून, ‘ते माझी छळवणूक करण्याचा प्रयत्न करीत आहेत,’ असा तक्रार अर्ज एका उच्चशिक्षित महिलेने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला. त्यामध्ये, आपल्या मागे माणसे लावणे, हेरगिरी करणे, जिवानिशी मारण्याचा प्रयत्न करणे, धाक दाखविणे यासारख्या आरोपांसह विनयभंग केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
अॅड. आभा सिंग यांनी न्या. संभाजी शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठापुढे हा अर्ज दाखल केला. ‘सन २०१३मध्ये माझ्या रेस्टॉरंटबाहेर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी माझ्यावर केलेल्या हल्ल्याविषयी माहिम पोलिस ठाण्यात आणि सन २०१८मध्ये माझ्या कारवर झालेल्या हल्ल्याबाबत वाकोला पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवला होता; मात्र, पोलिसांकडून याबाबत कोणतीही कारवाई झाली नाही. त्यांनी संजय राऊत यांचा साधा जबाबही नोंदवला नाही,’ असे या महिलेने याचिकेत म्हटले आहे.
या याचिकेमध्ये मुंबई पोलिसांना देखील प्रतिवादी करण्यात आलेलं आहे. या सगळ्या गोष्टींविषयी आपण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून दाद मागितली पण राऊत हे त्यांच्याच पक्षाचे असल्यामुळे याची कोणतीही दखल मुख्यमंत्र्यांकडून घेण्यात आली नाही असे देखील या याचिकेत संबंधित महिलेने म्हटले आहे. या सगळ्यामुळे आपण राष्ट्रीय महिला आयोगाकडे देखील तक्रार केली. आयोगानं नोंदवून कारवाई करण्याचे आदेश दिले. परंतू बीकेसीच्या पोलीस उपायुक्तांनी अजूनही त्याची दखल घेतलेली नाही, असं या याचिकेत म्हणण्यात आलेलं आहे. या पोलीस उपआयुक्तांनाही या याचिकेत प्रतिवादी करण्यात आलेलं आहे.
















