अमळनेर (प्रतिनिधी) महसूल प्रशासनाला अनेकवेळा पत्र पाठवूनही वाळू माफियांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने शिवसेनेने तहसीलदारांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
शिवसेना तालुका प्रमुख विजय पाटील, शिव वाहतूक सेना तालुका प्रमुख रमेश पाटील यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मांडळ गावातील शेतकऱ्यांचे जीवन संपूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. शेती ही पांझरा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. पांझरेच्या पात्रातून प्रचंड प्रमाणात वाळू वाहतूक सुरू असून त्यामुळे पर्यावरणाची नासाडी होत आहे. तसेच रात्री-बेरात्री वाळू वाहतूक होत असल्याने जनतेला खूप त्रास होत आहे. पांझरेच्या पात्रातून वावडे आणि जवखेड्याच्या पाणी पुरवठा योजना आहे.
वाळू उपसा झाल्यानन्तर सिंचनावर परिणाम होतात. त्यामुळे भविष्यात काही गावांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाळू वाहतुकदारांचा बंदोबस्त करावा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसू असा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आला आहे.