मुंबई (वृत्तसंस्था) राज्यसभेच्या सहाव्या जागेवर शिवसेनेच्याच उमेदवाराची वर्णी लागली आहे. शिवसेनेकडून कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख संजय पवार (Kolhapur Shiv Sena district President Sanjay Pawar) यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. शिवसेनेने संजय पवार यांना आपले उमेदवार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. लवकरच यासंदर्भात अधिकृत घोषणा होणार आहे.
राज्यसभेच्या सहाव्या जागी शिवसेनेचाच उमेदवार असणार, हे संजय राऊतांचे उद्गार अखेर खरे ठरले, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नावाची वर्णी लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अद्याप पक्षाकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान, शिवसेनेकडून राज्यसभेसाठी संभाजीराजे छत्रपतींसोबतच चंद्रकांत खैरे आणि संजय पवार यांच्या नावाची चर्चा होती.
संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेची पक्षप्रवेशाची ऑफर नाकारली. त्यामुळे शिवसेना उमेदवार देणार हे स्पष्ट झालं होतं. या उमेदवारीसाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आणि संजय पवार यांची नावं आघाडीवर असल्याची माहिती मिळत होती. मंगळवारी टाळ्या आणि शिट्ट्या ऐकायला मिळतील असं सूचक वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. त्यामुळे सहाव्या जागेच्या उमेदवारीसाठी मातोश्रीचा हात कुणाच्या डोक्यावर असणार याची उत्सुकता लागली होती. दुसरीकडे शिवसेनेकडून देण्यात आलेल्या पक्ष प्रवेशाच्या निमंत्रणाकडे संभाजीराजे छत्रपती यांनी पाठ फिरवली. त्यामुळे संभाजीराजेंची पुढची भूमिका काय असेल याकडंही लक्ष लागलं आहे. याच अनुषंगाने शिवसेनेच्या एका बड्या नेत्यासोबत मराठा क्रांती मोर्चाच्या प्रमुख समन्वयकांची आज बैठक पार पडणार आहे.