एरंडोल (प्रतिनिधी) शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले यांना पिक कर्ज प्रकरणात जिल्हा बँकेचे निपाणे शाखा व्यवस्थापक दिनेश उत्तमराव पाटील याने लाथा व चापटा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केल्याची घटना आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी आमले यांनी दिलेल्या तक्रारीवरून एरंडोल पोलीसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा जवखेडे सिम येथील शेतकरी ज्ञानेश्वर आमले हे जिल्हा बँकेच्या निपाणे येथील शाखेत पीक कर्जाचे पैसे घेण्यासाठी गेले असता. त्यांना पैसे मिळाले नाहीत. म्हणून त्यांनी एटीएम गाठले मात्र तिथून सुद्धा त्यांना रिकाम्या हाताने परत व्हावे लागले. त्याबाबत शाखा व्यवस्थापक दिनेश उत्तमराव पाटील त्यांना जाब विचारला असता. त्यांनी अरेरवीचे वर्तन करून ज्ञानेश्वर आमले यांना लाथा व चापटा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच या मुजोर व्यवस्थापकाने गावातून लोक आणून तुला जिवंत ठेवणार नाही, असा आमले यांना दम दिला. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश दहिफळे व अनिल पाटील, संदीप सातपुते, अखिल मुजावर हे पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान बँक शाखा व्यवस्थापक दिनेश पाटील यांची या प्रकरणावरून उत्राण शाखेला उचलबांगडी करण्यात आली आहे.