नंदूरबार (प्रतिनिधी) माजी मंत्री आणि भाजपचे बडे नेते विजयकुमार गावित यांना जोरदार धक्का बसला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील महत्वाची मानली जाणारी कोपर्ली जि.प.गटात गावित यांचा पुतण्या पंकज गावित याचा पराभव झालाय. या ठिकाणी शिवसेनेचे राम चंद्रकांत रघुवंशी यांनी भाजपचे पंकज गावित यांना पराभूत केले आहे. अँड. राम चंद्रकांत रघुवंशी हे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे पुत्र आहे.
भाजप नेते डॉ.विजयकुमार गावित यांची कन्या तर खासदार डॉ. हिना गावित यांच्या लहान बहीण डॉ. सुप्रिया गावित यांना कोडदा गटातून उमेदवारी देण्यात आली होती. त्या सुप्रिया गावित या १३२६ मतांनी विजयी झाल्या आहेत.
ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी राज्यात सहा जिल्हा परिषदात पोटनिवडणूक झाली. आज त्याचा निकाल लागणार आहे. नागपूर, अकोला, वाशिम, धुळे, नंदूरबार, पालघर या सहा जिल्हा परिषदांसाठी काल मतदान झालं. पोटनिवडणुकीसाठी सुमारे ६३ टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यानं सहा जिल्हा परिषदांमध्ये २२९ जागा रिक्त झाल्यात.