जळगाव (प्रतिनिधी) “हे पहा छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे प्रेरणास्त्रोत आहेत आणि मला जेवढी माहिती होती, जेवढं मी सुरुवातीच्या काळात वाचलं होतं, त्यावरून मला माहीत होतं की समर्थ रामदास स्वामी हे त्यांचे गुरू आहेत. मात्र इतिहासातील काही तथ्यं मला लोकानी सांगितली आहेत, तर मी ती तथ्यं पुढे तपासून घेईन.” असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माध्यमांना सांगितलं. ते सध्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत
समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू होते. समर्थ रामदास नसते, तर शिवाजी महाराज नसते, असं भगतसिंह कोश्यारी म्हणाले होते. त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचे राज्यात आज पडसाद उमटले. राज्यपालांनी माफी मागावी अशी मागणीही होत असून, काही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी राज्यपाल पदाच्या गरिमेवरूनही टोला लगावला आहे. राज्यात ठिकठिकाणी निषेध केला जात असून, या वादग्रस्त विधानाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. जळगाव दौऱ्यावर असताना माध्यमांनी त्यांनी औरंगाबादेतील कार्यक्रमात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल प्रश्न विचारला.
माध्यमांशी बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, “शिवाजी महाराज देशाचे प्रेरणास्त्रोत आहेत. मला इतिहासाची जितकी माहिती होती. सुरुवातीच्या काळात जितकं वाचलं होतं, त्यामुळे मला इतकं माहिती होतं की समर्थ रामदास शिवाजी महाराजांचे गुरू आहेत. पण इतिहासातील तथ्य मला लोकांनी सांगितले आहेत. तर आता मी त्या तथ्यांबद्दल विचार करेन”, असं राज्यपाल कोश्यारी म्हणाले. यावेळी त्यांना वादग्रस्त विधानाबद्दल माफी मागावी, अशी मागणी होतेय. माफी मागणार का? असंही विचारण्यात आलं. मात्र, काहीही न बोलता राज्यपाल गाडीच्या दिशेनं निघून गेले.