पुणे (वृत्तसंस्था) शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आजच १०० व्या वर्षात पदार्पण केले आहे. बाबासाहेब पुरंदरेंच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली. राज ठाकरे यांनी सर्वप्रथम बाबासाहेब पुरंदरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांचा सन्मान केला. तसंच त्यांच्या पायावर डोकं ठेऊन त्यांचा आशीर्वादही घेतला.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा आज ९९ वाढदिवस… आज ते १०० व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या सोहळ्याचं आयोजन टाळत त्यांच्या वाढदिवसानिमित्त छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलंय. या कार्यक्रमाला राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली. राज ठाकरे यांनी सर्वप्रथम शिवशाहीरांचा सन्मान केला. गुलाबपुष्प आणि पगडी घालून शिवशाहीरांप्रति त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसंच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पायावर डोकं ठेऊन त्यांचे आशीर्वादही घेतले.
पुरंदरे- ठाकरे कुटुंबांचं जुनं नातं
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि ठाकरे घराण्याचं नातं हे गेल्या काही दशकापासूनचं आहे. बाळासाहेब ठाकरे आणि बाबासाहेब पुरंदरे यांचा विशेष जिव्हाळा होता. बाबासाहेब पुरंदरे यांच्या अनेक व्याख्यानांना बाळासाहेब ठाकरे हजेरी लावायचे. त्यांच्या बरोबर ते राज ठाकरे यांना देखील घेऊन जायचे. बाबासाहेब आणि बाळासाहेबांच्या पुण्या-मुंबईत भेटीही व्हायच्या. यावेळीही राज ठाकरे सोबत असायचे. एकंदरित बाबासाहेबांचं व्यक्तीमत्व राज ठाकरे यांना विशेष भावतं. राज ठाकरेंनी बाबासाहेबांची रायगडावर विशेष मुलाखत घेतली होती.
जाणता राजा महानाट्याचे निर्माते
बाबासाहेब पुरंदरे यांचं मूळ नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे असं आहे. पुण्याजवळच्या सासवडमध्ये २९ जुलै १९२२ रोजी त्यांचा जन्म झाला. पुण्यातल्या भारत इतिहास संशोधक मंडळासोबत त्यांनी इतिहास संशोधक म्हणून काम सुरु केलं. २०१५ सालापर्यंत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर बारा हजाराहून अधिक व्याख्याने दिली आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला.
बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी लेखन तसेच नाट्यलेखन व जाणता राजा या नाटकाचे दिग्दर्शन केले. त्यांना २०१५ साली महाराष्ट्रभूषण तर २०१९ साली पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या जाणता राजा या महानाट्याचे गेल्या २७ वर्षांत १२५० हून अधिक प्रयोग झाले आहेत. हे नाटक हिंदी-इंग्रजीसह ५ अन्य भाषांत भाषांतरित केले गेले आहे.’जाणता राजा’ मध्ये १५० कलावंत काम करतात आणि शिवाय हत्ती घोडेही असतात. प्रयोग करण्यासाठी मोठे मैदान लागते आणि तिथे फिरता रंगमंच उभारण्यासाठी १०दिवस आणि उतरवण्यासाठी ५ दिवस लागतात.