इंग्लंड (वृत्तसंस्था) कोरोना व्हायरसमुळं संपूर्ण जगावर ओढावलेलं संकट आता आणखी बळावताना दिसत आहे. पहिल्या कोरोना विषाणूच्या आघातातून जग सावरत नाही तोच काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या नव्या प्रकाराबाबत ब्रिटननं साऱ्या जगाला सजग केलं. ज्यानंतर आता कोरोना व्हायरसच्या आणखी एका प्रकारामुळं ब्रिटनमध्ये पुन्हा हाहाकार माजल्याचं वृत्त आहे.
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा अवतार सापडल्यामुळे जगभरात एकच खळबळ उडाली आहे. अशातच कोरोनाचा दुसरा स्ट्रेनही समोर आला आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन जुन्या रुपांपेक्षा अधिक घातक असल्याचं बोललं जातं. जुन्या अवतारांच्या तुलनेत हा वेगाने पसरत असल्याचं निरीक्षण आहे. कोरोनाच्या दुसऱ्या स्ट्रेनच्या दोन केसेस सापडल्याची माहिती ब्रिटनच्या आरोग्य सचिवांनी दिली आहे. विषाणूचा नवा अवतार दक्षिण आफ्रिकेतून आल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे. व्हायरसचा हा प्रकार दक्षिण आफ्रिकेहून परतलेल्या दोन व्यक्तींमार्फत ब्रिटनमध्ये पोहोचल्याचं म्हटलं जात आहे. ब्रिटनचे आरोग्यमंत्री हँकॉक यांनी बुधवारी यासंदर्भातील माहिती दिली. या व्हायरसचा नवा प्रकार अधिक वेगानं संसर्ग पसरवत असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली. मागील आठवड्यात दक्षिण आफ्रिकेतील आरोग्य विभागानं येत्या काही दिवसांमध्ये कोरोना संसर्गात वाढ होण्यास विषाणूचा हाच प्रकार कारणीभूत ठरु शकतो असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं होतं. कोरोनाच्या दुसऱ्या स्ट्रेनचा संसर्ग झालेल्या दोन बाधित व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. दक्षिण आफ्रिकेच्या प्रवासावरही निर्बंध लावण्यात आले आहेत. दक्षिण आफ्रिकेतील कुठल्याही व्यक्तीशी संपर्कात आलेल्या सर्व ब्रिटनच्या रहिवाशांनाही क्वारंटाईन होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या नव्या अवताराबाबत संशोधन केलं जात आहे.
दरम्यान, नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनमध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. यामुळे विरोधकांनी बोरिस जॉनसन सरकारला लक्ष्य केलं आहे. बोरिस हे दीर्घ काळापासून कोरोना व्हायरसच्या आड लपत आहेत. सरकारने शास्त्रीय दृष्टीकोणातून निर्बंध घातले पाहिजेत. आपल्या उणीवा लपवण्यासाठी सरकारने विनाकारण कुठलेही निर्बंध घालू नये, असं लेबर पार्टीने म्हटलं आहे.