पुणे (वृत्तसंस्था) येथील पिंपरी चिंचवड शहरात २४ वर्षीय तरुणीने इमारतीवरून उडी मारत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. नोकरी लागण्यासाठी ऍडव्हान्स कोर्स करण्यासाठी ३० हजार रुपये नसल्याने तरुणीने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं. नम्रता गोकुळ वसईकर असं २४ वर्षीय आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नम्रता ही अत्यंत हुशार मुलगी होती. धुळे येथे तिचं बिटेक शिक्षण झालं होतं. नम्रताच्या भावाला नोकरी लागली होती. नम्रतालादेखील हिंजवडीत चांगली नोकरी लागेल या आशेवर सर्व कुटुंब धुळे येथून वाकड येथे स्थायिक झालं होतं. वडील हे वाकड चौकात बूट पॉलिश करण्याचं काम करतात. नम्रताला चांगली नोकरी लागण्यासाठी ऍडव्हान्स कोर्स करायचा होता. त्याचे शुक्ल ३० हजार होते, याबाबत तिने आई वडिलांना माहिती दिली. आई- वडिलांनी नम्रताला काही दिवस थांबण्यास सांगितलं होतं. पैसे आल्यावर हा कोर्स कर असं आई वडिलांनी तिला सांगितलं होत. मात्र, पैसे जमा करून देण्याअगोदरच नम्रताने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं.
दोन दिवसांपूर्वी तिने घराच्या जवळच असलेल्या माऊली चौकातील इमारतीवर जाऊन चौथ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. उंच ठिकाणाची भीती वाटत असल्याने नम्रताने डोळ्यांवर स्कार्फ बांधला होता अस पोलिसांनी सांगितलं आहे.