इगतपुरी (प्रतिनिधी) तालुक्यातील भावली धरणात पाच जणांचा बुडून अंत झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या दुर्घटनेत नाशिकरोड येथील गोसावीवाडीतील एकाच कुटुंबातील – तीन मुली व दोन मुलांचा मृत्यू झाला.
मंगळवारी नाशिकरोड येथील गोसावीवाडीतील एकाच कुटुंबातील काही सदस्य रिक्षाने इगतपुरी येथील भावली धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास यातील काही युवक, युवती धरणाच्या पाण्यात उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने युवती बुडू लागल्या. त्या घाबरून ओरडत असल्याचे पाहून बाजूला उभ्या असलेल्या तिघांनी पाण्यात उड्या घेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही खोल पाण्याचा अंदाज न आल्याने पाचही जण बुडाले.
स्थानिक काही तरुणांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यांना यश आले नाही. रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिका-यांनी पाचही जणांना मयत घोषित केले. त्यानंतर मृतदेहांची उत्तरीय तपासणी करण्यात आली. दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे अनस खान विलदार खान (१७), नाक्षिका इमरान खान (१५), मिसवालियार खान (१६), हनीफ अहमद शेख (२४) वईकरा दिलवार खान (१४), अशी आहेत.