कोलकाता (वृत्तसंस्था) पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर वाढदिवसाच्या पार्टीत सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे. (rape on minor) घरी परतल्यावर तिचा मृत्यू झाला. मुख्य आरोपी हा तृणमूल काँग्रेसच्या एका पंचायत सदस्याचा मुलगा आहे, असा दावाही मुलीच्या परिवाराने केला आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी ब्रजगोपाल उर्फ सोहेल गयाली याला अटक करण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्याच्यावर POCSO व्यतिरिक्त बलात्कार, खून आणि पुरावे दडपण्याचे आरोप आहेत. दरम्यान, या प्रकरणात कायदेशीर हस्तक्षेप करण्यासाठी कोलकाता उच्च न्यायालयात दोन जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उच्च न्यायालयाच्या खंडपीठात मंगळवारी या प्रकरणी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
स्थानिक टीएमसी नेत्याच्या घरी झालेल्या पार्टीहून वापस आल्यानंतर आमच्या मुलीचे रक्त खूप वाहत होते तसेच तिच्या पोटातही दुखत होते. याआधी की आम्ही तिला रुग्णालयात घेऊन जाऊ, तिचा मृत्यू झाला. पार्टीत उपस्थित लोकांशी बोलल्यानंतर आम्हाला खात्री झाली की आरोपी आणि त्याच्या मित्रांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
बळजबरीने केले अंत्यसंस्कार
अल्पवयीन मुलीचे मृत्यू प्रमाणपत्र जारी होण्यापूर्वीच तिच्या मृतदेहावर बळजबरीने अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. काही लोकांनी सुरुवातीला मुलीला कोणत्याही सरकारी दवाखान्यात किंवा खासगी आरोग्य सुविधेत न नेण्याचा इशारा दिला होता आणि तिला कुठल्यातरी डॉक्टरकडे नेण्यास सांगितले होते, असा आरोपही पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे.