पंढरपूर (वृत्तसंस्था) यवतमाळनंतर आता पंढरपुरातही चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ होत असल्याचं समोर आलं आहे. पोलिओ लस लहान बाळाला देताना ड्रॉपसोबत प्लास्टिकचा तुकडा सुद्धा बाळाच्या पोटात गेला आहे. त्यामुळे बाळाला दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. पंढरपूर तालुक्यात भाळवणी प्राथमिक आरोग्य केंद्रात ही घटना घडली आहे.
यवतमाळमध्ये पोलिओ लस देण्याऐवजी सॅनिटायझर देण्यात आल्याची धक्कादायक घटना ताजी असताना पंढरपूरमध्येही धक्कादायक घटना समोर आली आहे. ३१ जानेवारी रोजी पोलिओ लसीकरणाची मोहिम राज्यात राबवण्यात आली होती. रविवारी सोलापूर जिल्ह्यात पोलिओ लस देण्यासाठी आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्रासह अंगणवाड्यामध्ये लसीकरणाची सोय केली होती. सकाळी भाळवणी इथं राहणारे माधुरी व त्यांचे पती बाबा बुरांडे हे आपल्या एक वर्षाच्या बाळाला पोलिओची लस देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात घेवून आले होते. बाळाला लस देत असताना ड्रॉपच्या बाटलीचा प्लास्टिकचा तुकडा सुद्धा बाळाच्या तोंडात गेला. त्यामुळे आता बाळाची प्रकृती खालावली आहे. बाळाला तातडीने उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले आहे. सध्या डॉक्टरांनी बाळाला औषध दिले असून दोन दिवसांनी पुन्हा तपासणी केली जाणार आहे. दरम्यान, झालेल्या या प्रकाराबद्दल पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
दरम्यान, चिमुकल्यांच्या आरोग्याबाबत हलगर्जी बाळगणारी घटना यवतमाळमध्ये समोर आली होती. पोलिओ लसीकरणावेळी सॅनिटायजर पाजल्यामुळे यवतमाळमध्ये १२ चिमुकल्यांची प्रकृती बिघडली. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हलगर्जीमुळे पाच वर्षांखालील चिमुरड्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.