औरंगाबाद (वृत्तसंस्था) घराशेजारी राहणारी महिला प्रेम संबंध ठेवून लग्न करण्यास दबाव आणत असल्याने, या विवाहित तरुणाने आत्महत्या सारखं टोकाचं पाऊल उचलले आहे. गणेश सुभाष मुसळे (वय 30) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर गणेश याच्या पत्नीच्या फर्यादीवरून शेजारी राहणाऱ्या महिलेवर बिडकीन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश मुसळे हा गेल्या काही महिन्यांपासून पत्नीसह सासुरवाडी शरनापुर येथे टायर पंक्चर दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. दरम्यान दोन तीन दिवसांपूर्वीच गणेश आई वडिलांना भेटण्यासाठी आपल्या मूळगावी लोहगावला आला होता. शुक्रवारी रात्री आईवडील झोपी गेल्यावर उशीरा घरातील एका खोलीत गणेश याने गळफास घेऊन जीवन संपवलं. दरम्यान मध्यरात्री आईला जाग आली असता मुलाने गळफास घेतल्याचे उघडकीस आले. त्यानंतर गणेशच्या पत्नीच्या फर्यादीवरून शेजारी राहणाऱ्या महिलेवर 306 प्रमाणे आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेशाच्या पत्नीने बिडकीन पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, गणेश मूसळे यास त्यांच्या शेजारी रहाणारी महिला तिच्यासोबत प्रेम संबंध ठेवून लग्न कर व स्वतःच्या पत्नीस सोडून दे अशा प्रकारचा वारंवार समक्ष व फोनवर तगादा लावून मारण्याच्या धमक्या देत असे. शेजारच्या महिलेच्या नेहमीच्या धमकीला आणि माणसिक त्रासाल कंटाळूनच गणेश याने आत्महत्या केली असल्याचं तिच्या पत्नीने पोलिसात दिलेल्या फर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार शेजारच्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास बिडकीन पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.