नाशिक (वृत्तसंस्था) आई ही मुलांसाठी जीवाची बाजी लावण्यास तयार असते. मात्र एका आईने तर प्रियकरास हाताशी धरून दहा वर्षाच्या मुलाचे अपहरण केले आहे. वारंवार पोलीसांना सांगुनही लक्ष दिले जात नसल्याने अखेर न्यायालयाच्या आदेशान्वये त्या आई व प्रियकरा विरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेहडी पंपिगरोड परिसरातील रहिवासी प्रशांत रणशिंगे व पूनम यांचा विवाह बारा वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना दहा वर्षांचा मुलगा आहे. दोघांचा संसार व्यवस्थित सुरू असताना दोघांमध्ये छोट्या-मोठ्या कारणावरून भांडण होऊ लागले. याचकाळात पत्नी तासन्तास मोबाइलवर बोलत असल्याचे लक्षात आल्याने पती प्रशांतच्या मनात संशय निर्माण झाला. त्याने पत्नीचा मोबाइल तपासला असता त्याच्यासमोर विशाल गिते असे नाव आले. मोबाइलमध्ये काही आक्षेपार्ह मेसेजही दिसले. यावरून दोघांमध्ये मोठे भांडण झाल्याने पूनमने अनैतिक संबंध असल्याचे मान्य केले होते. नातेवाइकांच्या मध्यस्थीनंतर त्यांचा संसार पुन्हा सुरू झाला. मात्र गेल्या १५ नोव्हेंबर रोजी प्रशांत कामावरून दुपारी आला असता मुलगा श्रवण हा खेळण्यासाठी गेल्यावर पुन्हा आला नसल्याचे दिसले.
पूनमही घरात दिसत नव्हती व तिचा फोन बंद होता. आजूबाजूला चौकशी केली असता एक इसम मुलाला घेऊन गेल्याचे समजले. घरातील कपाट तपासले असता कपाटातील रोख रक्कम एक लाख सत्तर हजार रुपये व सोन्याचे दागिने लंपास झालेले दिसले. त्यामुळे भयभीत झालेल्या प्रशांतने पैशांसाठी मुलाच्या जिवाला धोका असल्याचा विचार करून पोलिसांकडे धाव घेतली. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अखेर याबाबत न्यायालयात दाद मागितल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार नाशिकरोड पोलीस ठाण्यात पूनम प्रशांत रणदिवे व विशाल चंद्रभान गिते (रा. गिते मळा, चेहडी) यांच्या विरोधात मुलाचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.