पिंपरी चिंचवड (वृत्तसंस्था) पुण्यानजीक असणाऱ्या पिंपरी चिंचवड (Pimpri chinchwad) परिसरातील नेहरूनगर येथील एका तरुणानं स्वयंपाक बनवण्यास उशीर झाल्याच्या कारणातून आरोपीनं पत्नीच्या अंगावर डिझेल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. या धक्कादायक घटनेत पीडित महिला गंभीर जखमी (Wife injured) झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पतीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. बाबू ऊर्फ राहुल विठ्ठल पारधे असं गुन्हा दाखल झालेल्या २८ वर्षीय आरोपी पतीचं नाव आहे. तो पिंपरी परिसरातील नेहरूनगर येथील रहिवासी आहे. २८ वर्षीय महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. केवळ जेवण बनवण्यास उशीर झाल्याच्या कारणातून पतीने अमानुष शिक्षा दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी (शनिवारी) स्वयंपाक बनवण्यास फिर्यादीला उशीर झाला होता. त्यामुळे संतापलेल्या आरोपीनं जेवण वेळेवर न बनवल्याच्या कारणातून आणि चारित्र्याच्या संशयातून तिच्या अंगावर डिझेल ओतून तिला पेटवून दिलं आहे. यात पीडित महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच पिंपरी चिंचवड पोलिसांनी संशयित आरोपी पती राहुल पारधे याच्याविरोधात कलम ३०७ अन्वये खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. केवळ जेवण बनवायला उशीर झाल्याच्या कारणातून आरोपी पतीनं पत्नीला अमानुष शिक्षा दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. पीडितेवर रुग्णालयात उपचार केले जात आहेत.