उस्मानाबाद (वृत्तसंस्था) उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा नगरपालिका अनेक प्रकरणामुळे सारखी चर्चेत असते. अशीच नगरपालिके संदर्भात एक चर्चा सुरु आहे ती म्हणजे उमरगा शहरात एका अज्ञात व्यक्तीने तब्बल १७ रस्ते बांधले आहेत. या रस्त्यांची बिलं सुद्धा नगरपालिकेने भरली आहेत. नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर हे रस्ते अज्ञात व्यक्तीने बांधल्याचा धक्कादायक खुलासा नगरपालिकेनं केला असून अज्ञात व्यक्तीची शोधशोध सुरू झाली आहे.
२०१७ साली उमरगा नगरपालिकेनं शहरात अंतर्गत रस्ते बांधले. या पैकी १७ रस्ते कोणी बांधली याचा मेळच लागेना. नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर हे रस्ते अज्ञात व्यक्तीने बांधल्याचा खुलासा नगरपालिकेनं केला आहे. हे प्रकरण औरंगाबादच्या खंडपीठात गेले असता अज्ञात व्यक्ती ने रस्ते बांधल्याचे पाहून कोर्ट ही चक्रावून गेले व कडक शब्दात ताशेरे ओढत उमरगा नगरपालिकेमधील भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचे विशेष लेखापरीक्षण करा, असे आदेश दिले आहे. केवळ रस्तेच नाहीत तर गेल्या साडे चार वर्षांत उमरगा नगरपालिका क्षेत्रात जवळपास ८० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे कागदावर दिसून येत आहेत.
अज्ञात व्यक्तीचा शोध घ्यावा, उमरगावासीयांची मागणी
विहीर चोरीला गेल्याचे प्रकरण अख्या राज्याला माहीत आहे. त्याच्या वर जाऊन अज्ञात व्यक्तीने रस्ते बांधले आहेत. या प्रकरणाची चौकशी होऊन रस्ते बांधणारा अज्ञात व्यक्ती आहे तरी कोण याच शोध घ्यावा, अशी मागणी उमरगावासीय करत आहेत.
















