नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. अशातच आता कोरोनाने डॉक्टरांनाही गाठले आहे. दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलमधील ३७ डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. सर गंगाराम रुग्णालयातील पाच जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर, इतर डॉक्टर सध्या होम आयसोलेशनमध्ये आहेत.
कोरोना रुग्णांवर उपचार करताना हे डॉक्टर संक्रमित झाले आहेत. रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले की कोविड-१९च्या साथीच्या नुकत्याच झालेल्या लाटेमध्ये ३७ डॉक्टरांनी संसर्गाची पुष्टी केली आहे. सर गंगाराम रुग्णालयाच्या खासगी रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले की, कोविड-१९ रुग्णालयात उपचार करतांना ३७ डॉक्टरांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. यापैकी बहुतेक डॉक्टरांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. एकूण ३२ डॉक्टरांना सौम्य लक्षणे असून पाच डॉक्टरांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर गंगाराम हॉस्पिटलने गेल्या एक वर्षापासून साथीच्या काळात कोविड-१९च्या उपचारासाठी अग्रणी भूमिका बजावली आहे.
रुग्णालयातील पॉझिटिव्ह आढळलेल्या सर्व डॉक्टरांमध्ये काही हलकी लक्षणं असून कोणीही गंभीर स्थितीमध्ये नाही. दुसरीकडे कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता दिल्ली सरकारनं लोक नायक रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठीच्या बेडची संख्या १००० वरुन वाढवून १५०० केली आहे. सोबतच जीटीबी रुग्णालयातील बेडची संख्या ५०० वरुन १००० केली आहे. याशिवाय दातांच्या डॉक्टरांनाही कोविड रुग्णालयांमध्ये ड्यूटीवर ठेवलं जाणार आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येकडे पाहाता, हा निर्णय घेण्यात आला आहे.
मागील २४ तासात दिल्लीत ७४३७ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, कोरोनामुळे चोवीस जणांचा मृत्यू झाला आहे. आता दिल्ली कोरोनाबाधित अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २३१८१ वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा वाढून १११५७ वर पोहोचला आहे. मागील चोवीस तासांमध्ये पॉझिटिव्हीटी रेट ८.१० टक्के नोंदवला गेला आहे.