नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मध्य प्रदेशातील एका महिलेने आपल्या निवृत्त आयएएस (IAS) सासऱ्यावर आणि पतीवर गंभीर आरोप केले आहेत. महिलेचे म्हणणे आहे की, पतीच्या नपुंसकतेचे सत्य समोर आल्यानंतर सासरचे लोक तिच्यावर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत आहेत.
पीडितेचे म्हणणे आहे की, 24 नोव्हेंबर 2021 रोजी भोपाळमधील हॉटेलमध्ये तिचं लग्न झालं होते. महिलेचे म्हणणे आहे की, लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी तिला समजले की तिचा नवरा शारीरिक संबंध ठेवण्यासाठी सक्षम नाही. महिलेने सांगितले की, लग्नापूर्वी सासरच्यांनी ही गोष्ट तिच्यापासून लपवून ठेवली होती. यासंदर्भात पीडितेने भोपाळमधील आयजी (IG) आणि डीआयजींकडे तक्रार केली आहे. यामध्ये तिनं म्हटलं आहे की, पतीच्या नपुंसकतेचे सत्य समोर आल्यानंतर सासऱ्याने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे होते आणि त्यात यश न आल्याने त्यांनी तिच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पीडितेच्या म्हणण्यानुसार, पतीनेही तिला साथ दिली नाही.
या महिलेने सासरच्या लोकांवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोपही केला आहे. लग्नानंतर दोन दिवसांनी माझ्याकडे सात लाख रुपये रोख आणि फॉर्च्युनर कारची मागणी करण्यात आल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. रोज मारहाण सुरू झाली. पीडितेचे म्हणणे आहे की, तिच्या सासरच्या लोकांनी तिला घरातून हाकलून दिले आहे. मात्र, या प्रकरणी सासरच्या मंडळींच्या वतीने महिलेचे सर्व आरोप निराधार असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही पक्षांची तक्रार ऐकून घेतल्यानंतर आता या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.