जालना (वृत्तसंस्था) जालना जिल्ह्याच्या जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णीत जादूटोण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुप्तधन मिळविण्याच्या उद्देशाने एका नराधमाने मांत्रिक महिलेच्या मदतीने आपल्या पत्नीचाच नरबळी देण्याचा प्रयत्न केला. पण महिलेने वेळीच प्रसंगावधान दाखवत पतीचा विरोध केल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. याप्रकरणी पोलिसांनी महिलेच्या पतीसह त्याचा मित्र आणि एका महिला मांत्रिकाला बेड्या ठोकल्या.
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, २२ सप्टेंबर रोजी बुधवारी रात्री आरोपी पती संतोष पिंपळेसह जीवन पिंपळे आणि एक मांत्रिक महिला फिर्यादीच्या घरी आले होते. त्यांनी घरातील लाकडी खांबाला काहीतरी धरबंधन करून निघून गेले. त्यानंतर आरोपी संतोषने आपल्या पत्नीच्या अंगाला हळद-कुंकू आणि अगरबत्ती लावण्याचा प्रयत्न केला. पण नेमकं काय चालू आहे म्हणून घाबरलेल्या फिर्यादीने पतीचा विरोध केला. पण पतीने दमदाटी करत तिला मारहाण केली.
पतीने मारहाण केल्याने फिर्यादी महिलेनं आरडाओरड केली. त्यामुळे फिर्यादीचा मुलगा आणि शेजारील लोक घटनास्थळी आले. त्यांनी फिर्यादीची आरोपी पतीच्या तावडीतून सुटका केली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, आरोपी पती संतोष पिंपळे आणि जीवन पिंपळे या दोघांना अटक केली. संबंधितांना न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी रविवारी मांत्रिक महिलेला देखील अटक केली आहे.