जालना (वृत्तसंस्था) झोपेतच बाप-लेकाला सर्पदंश होत, त्यात वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती गंभीर असल्याची घटना परतूर शहरातील रेल्वेस्टेशन परिसरात गुरुवारी ही घटना घडली. सिकंदर पठाण असे मृत वडिलाचे नाव आहे तर सोहेल पठाण असे मुलाचे नाव आहे.
या संदर्भात स्थानिक वृत्तांमध्ये प्रसिद्ध वृत्तानुसार, सिकंदर पठाण (३३) हे परतूर रेल्वे स्टेशन परिसरात आपल्या परिवारासह वास्तव्यास होते. दिवसभर काम केल्यानंतर बुधवारी रात्री नेहमी प्रमाणे ते आपला मुलगा सोहेल पठाण (वय १७) यांच्यासह घरात झोपलेले होते. मध्यरात्री घरासमोरील वाढलेल्या झाडा झुडपातून विषारी सापाने घरात प्रवेश केला. बाप-लेकाला झोपेतच सापाने दोघांना दंश केला. दोघंही गाढ झोपेत असल्यामुळे त्यांना सापाने चावा घेतल्याचे लक्षात आले नाही. परंतू पहाटे ४ वाजेच्या सुमारास सिकंदर यांना अचानक मळमळ सुरु होत, उलट्या व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे त्यांनी घरातील सर्वांना उठवले. भेदरलेल्या परिवाराने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. परंतू उपचार सुरू असतानाच सिकंदर यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी हा प्रकार विषबाधेचा असल्याचा अंदाज व्यक्त केला.
दरम्यान, दु:खात असलेल्या परिवाराने सिकंदर यांचा दफन विधीला सुरुवात केली असतानाच मुलगा सोहेल याची तब्येत खराब व्हायला सुरुवात झाली. यला देखील मळमळ आणि उलट्या होऊ लागल्या. त्यामुळे सोहेलला देखील दंश झाल्याचे उपस्थितांच्या लक्षात आले. त्यामुळे त्याला तात्काळ छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोहेलची प्रकृती देखील गंभीर असल्याचे कळते. बाप-लेकाला सर्पदंश झाल्याचे स्पष्ट झाल्याने नंतर काही सदस्यांनी घरी येऊन पाहिले असता सिकंदरच्या अंथरुणात साप मृत अवस्थेत आढळला. सिकंदरच्या अंगाखाली दबून साप मेल्याचा अंदाज आहे. परंतू सापाने सिकंदरला चावा घेण्याअगोदर किंवा नंतर त्याने सोहेलला देखील चावा घेतल्याची शक्यता अनेकांनी वर्तवली.