नागपूर (वृत्तसंस्था) आईचा मृत्यू झाल्यामुळे विरह सहनच होत नव्हता. त्यामुळे मुलाने तलावात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची थरकाप उडविणारी घटना अंबाझरी तलावावर घडली. दरम्यान, यावेळी तलावावर असलेल्या पोलीस आणि एका जलतरण पटूने या युवकाला सुखरूप बाहेर काढून त्याचा जीव वाचविला.
अंबाझरी तलावात एका व्यक्तीचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांचा ताफा तलावावर पोहचला. त्यांनी जलतरणपटू देवीदास जांभळूकर (रा. चंद्रमनीनगर) यालाही सोबत नेले. मृतदेह बाहेर काढण्यात आला. तो राजेश कृष्णराव काळे (वय ५०, रा. कामगार कॉलनी) याचा असल्याचे उघड झाले. त्याचा पंचनामा करण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांना पंप हाऊसच्या बाजूला एका युवकाने तलावात उडी घेतल्याचे लक्षात आले. पोलिसांनी लगेच जांभूळकरच्या मदतीने त्या युवकाला पाण्याबाहेर काढले.
अंबाझरीचे ठाणेदार डॉ. अशोक बागूल, निरीक्षक हरिदास मडावी, सहायक निरीक्षक आचल कपूर, अंमलदार प्रशांत गायधने यांनी त्या युवकावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला विचारपूस केली. तसा तो ओक्साबोक्सी रडू लागला. पोलिसांनी त्याला दिलासा दिल्यानंतर कोणत्या कारणामुळे आत्महत्या करायला निघाला ते विचारले. पाचपावलीत राहणाऱ्या हर्ष नामक या युवकाच्या आईचे कारंजा लाड जवळ अपघाती निधन झाले. डोळ्यादेखत आईचा थरारक मृत्यू झाल्याने हर्ष कमालीचा अस्वस्थ झाला. राहून राहून त्याला तेच दृष्य आठवत असल्याने तो कासाविस होत होता. आईच्या विरहात त्याला जगने असह्य झाले होते. त्यामुळे आत्महत्या करायला निघाल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
ठाणेदार बागुल यांनी हर्षचे समुपदेशन केल्यानंतर पोलिसांनी त्याच्या वडिलांना फोन करून माहिती दिली. त्यामुळे हर्षच्या वडिलांसोबत मामाही तलावावर पोहचले. त्यांनी हर्षला प्रेमाने जवळ घेतले. भल्या सकाळीच तो घरून निघून गेला होता. त्याचा आम्ही शोधच घेत होतो. असे सांगत देवदूत बनलेल्या अंबाझरी पोलिसांचे तसेच जलतरणपटू जांभूळकर यांचे त्यांनी आभार मानले.