धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील मध्यवर्ती भागात बांधकाम सुरु असलेले झुमकराम सार्वजनिक वाचनालय आणि व्यापारी संकुलनाचे बांधकाम वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. संत सावता माळी शिक्षण संस्थेला भाडेतत्वावर जागा ठेण्याचा ठराव करून देखील संस्थेला अंधारात ठेवून बांधकाम सुरु करण्यात आल्याची धक्कादायक माहिती माळी समाज पंच मंडळ सदस्य तथा संस्थेचे चेअरमन ज्ञानेश्वर महाजन यांनी दिली आहे.
शहरातील मध्यवर्ती भागात सुरु असलेले झुमकराम सार्वजनिक वाचनालय आणि व्यापारी संकुलनातील दोन गट संत सावता माळी शिक्षण संस्थेसाठी आरक्षित होते. परंतू २००५ डीपी रीवाईज झाल्यानंतर हे आरक्षण संपुष्टात आल्याची माहिती पालिकेतील श्री. बिऱ्हाडे यांनी ‘द क्लिअर न्यूज’सोबत बोलतांना दिली. तर दुसरीकडे माळी समाज पंच मंडळ सदस्य तथा संस्थेचे चेअरमन माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी ‘द क्लिअर न्यूज’ सोबत बोलतांना सांगितले की, झुमकराम सार्वजनिक वाचनालय आणि व्यापारी संकुलनाचे बांधकाम सुरु असलेल्या दोन गटांवर संत सावता माळी शिक्षण संस्थेसाठी आरक्षण होते. सन २०१२-१३ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन शिक्षण संस्थेला जागा भाडेतत्वावर देण्याबाबत ठराव मी नगराध्यक्ष असतांनाच केला होता.
परंतू तरी देखील संबंधित शिक्षण संस्थेला अंधारात ठेवून बांधकाम सुरु करण्यात आले आहे. ही बाब अत्यंत चुकीची आहे. पालिका प्रशासनाने यावर विचार करून व्यापारी संकुलातील एक संपूर्ण मजला शाळेसाठी राखीव करावा. अन्यथा शाळेला पर्यायी जागा द्यावी. अन्यथा या संपूर्ण प्रकरणाबाबत लवकरच तक्रार करेल. दरम्यान, शिक्षण संस्थेसाठी राखीव जागेवर व्यापारी संकुल उभारणीचा डाव गंभीर असून तालुक्यातील शैक्षणिक चळवळ धोक्यात आणण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया शिक्षणतज्ञ व्यक्त करत आहेत.