पिंप्री ता. धरणगाव (प्रतिनिधी) आठ महिन्यांपूर्वी गावातील एका पाळीव कुत्र्याने ५१ वर्षीय व्यक्तीला चावा घेतला होता. मात्र, याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांना रेबीजची लागण झाली. दुर्दैवाने यातच या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ईश्वर दगडू बडगुजर (रा.पिंप्री खुर्द), असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
तालुक्यातील पिंप्री खुर्द येथील ५१ वर्षांच्या व्यक्तीला पिसाळलेल्या पाळीव कुत्र्याने आठ महिन्यांपूर्वी चावा घेतल्याची घटना घडली होती. त्यांना रेबीजची लक्षणे जाणवल्याने रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे ईश्वर दगडू बडगुजर यांना आठ महिन्यांपूर्वी पिसाळलेल्या पाळीव कुत्र्याने चावा घेतला होता. त्यावेळी त्यांनी कुत्र्याच्या चावाकडे दुर्लक्ष केले.
२६ जून रोजी मात्र, त्यांना अचानक ताप आला. यानंतर त्यांना तातडीने जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने मुंबईतील सायन रुग्णालयात नेण्यात आले. परंतू तोपर्यंत खूप उशीर झालेला होता. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी ८ जुलै रोजी दुपारी धरणगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक दीपक पाटील हे करीत आहेत.