सोलापूर (वृत्तसंस्था) अक्कलकोट तालुक्यातील हंजगी इथं एक धक्कादायक घटना घडली. मळणी यंत्रात अडकून एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडलीय. भास्कर पवार असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
भास्कर पवार यांच्या शेतातील सोयाबीन काढलं होतं. काढलेल्या सोयाबीनची मळणी काढण्यात येत होती. त्यासाठी मळणी यंत्र शेतात आणलं होतं. सोयाबीनची रास हळूहळू मशीनमध्ये सरकवली जात होती. त्यावेळी मशीनवर हाताने सोयाबीन दाबत असताना, पवार यांना अंदाज आला नाही. सोयाबीन आत मशीनमध्ये ढकलता ढकलता त्यांचा हात मशीनमध्ये अडकला. त्यानंतर काही कळायच्या आत त्यांना मशीनने आत खेचून घेतलं. त्यामुळे त्यांच्या खांद्यापासून वरचा शरीराचा भाग पूर्णत: चेंदामेंदा झाला. यामध्ये भास्कर पवार यांचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेने उपस्थित सर्वचजण हादरुन गेले.