अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील प्रभाग क्र. ८ पिंपळे रोड परिसरात अमळनेर महापालिकेच्या कचरा जमा करणाऱ्या घंटागाडीत पुरुष जातीचे अर्भक मृतावस्थेत आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात न.पा. घंटागाडी चालक फिरोज संमसोद्दीन खाटीक (रा. लक्ष्मी टाकीजलळ गंधलीपुरा ता. अमळनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १८ मार्च २०२२ रोजी सकाळी ०६.३० वा. ते ०९.३० वाजेच्या सुमारास मी व माझ्या सोबत असलेला कंडक्टर व गाडीत कचरा जमा करणारा अजय प्रल्हाद बि-हाडे रा. अमळनेर असे आम्ही अमळनेर येथील प्रभाग क्र.०८ मधील सम्राट हॉटेलचा परीसर द्वारका नगर, बोरसे गल्ली, रामकृष्ण कॉलनी अशा परीसरातुन ओला व सुका कचरा जमा करीत असतांना कोणीतरी अज्ञात इसमाने नवजात जन्मलेले पुरुष जातीचे अर्भकाची जन्माची लपवणुक करण्यासाठी व त्याची गुप्तपणे विल्हेवाट लावण्यासाठी आमचा नगरपालीका घंटा गाडीचा कचऱ्यात टाकुन दिल्याने ते मरण पावलेल्या स्थितीत मिळुन आले. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकों सुनिल कौतिक हटकर करीत आहेत.