जळगाव (प्रतिनिधी) आदिवासी भिल्ल समाजाच्या व्यक्तींना मिळालेली इनामी जमीन एरंडोल प्रांतधिकाऱ्यानी आम्हाला कुठलीही नोटीस न देता अवघ्या ७ दिवसात परस्पर पाटील कुटुंबियांच्या नावावर केल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या तक्रारीची अपर जिल्हाधिकारींनी गंभीर दखल घेत चौकशीचे आश्वासन दिले आहे. या जमिनीची किंमत लाखोच्या घरात असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, एका पिडीतने पारोळा पोलीस स्थानक तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयात मारहाण, जातीवाचक शिवीगाळ केल्याची फिर्याद देऊन देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीय.
तक्रारदार कैलास बापु भिल, सचिन भिकन भिल, रघुनाथ भिकन भिल, शोभाबाई भिकन भिल (सर्व रा. कराडी ता.पारोळा) यांनी आपल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे की, आमचे पणजोबा कैं. हरी कमल भिल यांना सरकार तर्फे १९६३ झाली जुना सर्वे नंबर १०१ म्हणजेच आताचा गट क्रमांक ९१ मिळकत क्षेत्र ३ हेक्टर ४० आर आकार ८.३५ पैसे हे शेत सरकारी पडीत आकरी असल्याने व आम्ही भिल्ल आदिवासी असल्याने शासनाने अलोट कसून खाण्यास दिलेली होती. सदर मिळकतीचा आमचे पणजोबा हरी भिल यांच्यापासून ते आमचे आजोबा अभिमान हरी भिल यांच्या नावे पिक पेरा लागत होता व चालू होता. सदरचा पिक पेरा १९९४ पावतो अभिनव भिल यांच्या नावे होता. परंतू नंतर सदरची शेतजमीन आमच्या ताबे कब्जा उपयोगात असून आमच्या नावाचा पिक पेरा लागणे बंद दिसून येत आहे.
आम्ही आदिवासी भिल्ल समाजाचे असल्याने अशिक्षित असल्याने आमचे नावे पिक पेरा लागतो किंवा नाही याची आम्हाला कल्पना आली नाही. तसेच आमच्या या वर्णन केलेल्या जमिनीशी गावातील रामकृष्ण पुंडलिक पाटील, दीपिका रोहिदास पाटील, सुरेखाबाई पुंडलिक पाटील यांचा दुरापास्तच संबंध नसताना तसेच त्यांचे सदर जमिनीशी कुठलाही कोणताही नाव किंवा हकीगत संबंध नसताना, त्यांनी आमची शेत जमीन त्यांच्या नावे करून घेणे कामी दिनांक नसलेला अर्ज उपविभागीय अधिकारी एरंडोल यांच्याकडे केला होता. त्याची कुठलीही शहानिशा न करता मंडळ अधिकारी यांच्या चुकीच्या अहवालावरून तसेच चौकशी न करता १० ऑगस्ट रोजी आदेश पारित करून थकीत तगाई कर्ज भरून वर उल्लेखित आमच्या कब्जे उपभोगातील शेतजमीन वरील तिन्ही लोकांचे नावे करून देण्याचे आदेश पारित केला आहे.
वास्तविक पाहता सदरची शेत जमीन आजही आम्हीच कसत असून आम्हीच उत्पन्न घेत आहोत. आमचा संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह या शेतीतून सुरू आहे. सदर शेत जामीन शिवाय आम्हाला उपजीविकेचे दुसरे कोणतेही साधन नाही. तसेच शेत मिळकती वरील तिन्ही व्यक्तींचा काहीही संबंध नसून त्यांनी सर्कल तामसवाडी यांना हाताशी धरून व हातमिळवणी करून सदरचा अर्ज करून आमची जमीन स्वतःच्या नावे लावून घेण्याचा घाट घातला. तसेच या संबंधात चुकीचा आदेश एरंडोल उपविभागीय अधिकारी यांनी त्याबाबतची नोंद क्रमांक १६७८ पारित करून समोरच्या व्यक्तीचा काहीएक संबंध नसताना व कोणते कागदपत्र न पाहता आम्हाला कोणत्याही प्रकारची नोटीस, सूचना न देता समोरच्यांच्या नावावर केली आहे.
सदर मिळकत भिल्ल समाजाची ताबे उपभोगात असताना केवळ आम्ही भिल्ल आहोत आम्हाला कोणत्याही कायद्याचे ज्ञान नसल्यामुळे आमच्या अनाडी पणाचा फायदा घेऊन संबंधित यांच्या नावे करण्यात आली असल्याचे तक्रारी अर्जात म्हटले आहे. तसेच आमच्या कब्जा उपभोग आतील करडी शिवरात्रि क्षेत्र गट क्रमांक ९१ संदर्भात विभागीय आयुक्त संकीर्ण कवी ४३५/२०२० रोजी पारित केलेला आदेश व त्यावरून झालेली फेरफार क्रमांक १६७८ रद्द करण्याचा आदेश द्यावा व संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी व आम्हाला न्याय द्यावा, असे देखील म्हटले आहे. दरम्यान, या संदर्भात पिडीत आदिवासी भिल्ल बांधवांनी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांची भेट घेत नुकतीच आपली व्यथा मांडली. त्यानंतर श्री. महाजन यासबंधी सर्व कागदपत्रांची झेरॉक्स करून घेत सुमोटो अॅक्शन घेत सर्व रेकॉर्ड पारोळ्याहून मागवून तक्रारीची गंभीरतेने चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.
मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार
याबाबत विश्वनाथ फुला भिल यांनी पारोळा पोलीसात तसेच पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पुंडलिक नथ्यू पाटील, रोहिदास शांताराम पाटील, रामकृष्ण पुंडलिक पाटील व इतर दोन महिलांनी ३१ ऑक्टोबर रोजी गावाच्या बस स्थानकावर अडवून शेतात पाय ठेवला तर तुमच्या त्याच शेतात मूडदा पाडू अशी धमकी देत जाती वाचक शिवीगाळ केली. याबाबत तक्रार देऊन देखील अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.