जळगाव (प्रतिनिधी) शहरालगत असोदा गावाजवळ जुन्या वादातून एका तडीपार गुंडाने शुक्रवारी मध्यरात्री गोळीबार केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतल्याचे कळते.
असोदा गावाजवळ असलेल्या हॉटेल आर्याशेजारी एक पत्त्यांचा क्लब सुरू होता. मध्यरात्रीनंतर ३ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील एक तडीपार गुंड त्याठिकाणी पोहचला. जुन्या वादातून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने त्याने योगेश उर्फ हृतिक कोल्हे याला धमकी देत हवेत ३ राऊंड फायर केले. १५ दिवसांपूर्वी देखील दोघांमध्ये वाद झाला असल्याचे कळते. घटनेची माहिती मिळताच या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप गावित, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्यासह जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांनी घटनास्थळी दाखल झाले होते. तडीपार गुंड हा जळगावातील कासमवाडी परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, दुचाकीवर आलेल्या दोन जणांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.