पुणे (वृत्तसंस्था) जीवनाला कंटाळून मी हे टोकाचे पाऊल उचलत आहे. मुलांना जगताप मळ्यातील विहिरीत ढकलून देत त्यांची हत्या केली आहे. आमच्यानंतर मुलांचे हाल होऊ नयेत म्हणून त्यांना मारले आहे, अशा आशयाची चिठ्ठी डॉ. अतुल शिवाजी दिवेकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहिली होती. तत्पूर्वी डॉ. अतुल दिवेकर यांनी पत्नी आणि आपल्या दोन पोटच्या मुलांचा खून केला होता.
नेमकं काय घडलं !
डॉ अतुल शिवाजी दिवेकर, पत्नी-पल्लवी-अतुल दिवेकर, वेदांतीका (मुलगी),अदत्विक (मुलगा) अशी मृतांची नावे आहेत. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला होता. अतुल शिवाजी दिवेकर वरवंड येथील चैताली पार्क येथे कुटुंबासमवेत राहत होते. मंगळवारी दुपारी परिसरातील एका व्यक्तीने त्यांच्या घराचा दरवाजा ठोठावला. आतून काही प्रतिसाद येत नसल्याने खिडकीतून डोकावून पाहिले असता, त्यांना अतुल यांचा मृतदेह गळपास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. संबधित व्यक्तीने आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिक जमा झाले. त्यांनी दार उघडून बघितले असता, अतूल यांच्यासोबत त्यांच्या पत्नीचा मृतदेह खाली पडलेला होता.
मृतदेहाजवळ सापडली चिठ्ठी !
घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी घराची पाहणी केली असता अतुल यांच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठी सापडली. यामध्ये मी पत्नीचा गळा आवळून व दोन मुलांना विहिरीत टाकून त्यांचा खून केला. तर मी स्वतः आत्महत्या करीत असल्याचे म्हटले होते. त्यानुसार पोलिसांनी संबधीत विहिरीत पाहणी केली. दोघं मुलांचे मृतदेह विहिरीत आढळून आले आहेत. दरम्यान, डॉ.अतुल दिवेकर हे व्यवसायाने गुरांचे डॉक्टर म्हणून काम पाहत होते, तर पत्नी पल्लवी दिवेकर या श्री गोपीनाथ माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होत्या. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मुलांचे हाल होऊ नये म्हणून त्यांना संपवले !
पोलिसांना घटनास्थळावरून सुसाइड नोट मिळाली असून त्यात “जीवनाला कंटाळून मी हे टोकाचे पाऊल उचलत आहे. मुलांना जगताप मळ्यातील विहिरीत ढकलून देत त्यांची हत्या केली आहे. आमच्यानंतर मुलांचे हाल होऊ नयेत म्हणून त्यांना मारले आहे. या गोष्टीस सर्वस्वी मी जबाबदार आहे,’ असे सुसाइड नोटमध्ये म्हटले आहे.
दोघांमध्ये नेहमी व्हायची भांडण !
अतुल दिवेकर हे पशुवैद्य डॉक्टर असून त्यांच्या पत्नी शिक्षिका होत्या. किरकोळ वादातून दोघांमध्ये भांडण झाल्याची चर्चा आहे. दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती. या भांडणांमुळे अतुल अस्वस्थ होत होता. दरम्यान, मंगळवारी पुन्हा एकदा भांडण झाले, त्यामुळे संतापलेल्या अतुलने पत्नी पल्लवीचा गळा आवळून खून केला. यानंतर त्याने आपल्या दोन्ही मुलांना घराजवळील विहिरीत फेकून दिले. त्यानंतर घरी परत येऊन गळफास लावून घेतला. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून सुसाईड नोट पोलिसांनी जप्त केली आहे. यातून ही माहिती समोर आलीय.