अकोला (वृत्तसंस्था) एका आदिवासी मजूर महिलेने भर उन्हात रस्त्यालगत एका बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. १९ जून) वाडेगाव येथे घडली. महिलेला प्रसूती कळा सुरु होताच परिसरातील महिला धावून आल्या अन् त्यांनी मातेची सुखरूप प्रसूती करीत रुग्णालयात दाखल केले.
याबाबतचे वृत्त आज ‘दैनिक लोकमत’ने प्रसिद्ध केले आहे. या वृत्तानुसार वाडेगाव येथील एका शेतात वाशिम जिल्ह्यातील मुंगळा या गावतील एक कुटुंब कामासाठी आले होते. महिला गरोदर होती, अचानक पोट दुखू लागल्याने गरोदर महिला पतीसोबत वाडेगाव येथील खासगी दवाखान्यात तपासणीसाठी आली. तेथे डॉक्टरांनी तिला थांबण्यास सांगितले. त्यानंतर थोड्या वेळात महिलेच्या पोटात दुखू लागल्याने तेथे उपस्थित शेत मालकाने एका ऑटो चालकाला तत्काळ पाठविले व महिलेला पुढील उपचारांसाठी नेण्याच्या सूचना केल्यात.
परंतू तेवढ्यात महिलेला कळा असाह्य झाल्या. महिला बाळाला जन्म देणार ही बाब परिसरातील महिलांच्या लक्षात येताच त्या रणरागिणी धावून आल्या. संतापजनक म्हणजे या प्रकाराबाबत डॉक्टरांना सांगूनही डॉक्टराकडून केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप पतीने केला आहे. परिसरातील महिलांनी साड्यांच्या कपड्यामध्ये झाकले आणि त्यानंतर भर उन्हात महिलेने बाळाला जन्म दिला. दरम्यान, नाळ काढता येत नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. तेथे उपचार करून अकोला येथे पाठविले.