इटावा (वृत्तसंस्था) मित्रांसह पतीनेच आपल्या पत्नीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हनिमूनच्या रात्रीच आरोपी पतीने पीडित विवाहितेला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर मित्रांमार्फत बलात्कार केला आहे. एवढंच नाहीतर तिची प्रकृती बिघडल्यानंतर आरोपींनी पीडितेला रुग्णालयात दाखल करून पळ काढला आहे. संबंधित घटना उत्तर प्रदेशातील इटावा येथील आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ नोव्हेंबर रोजी चौबियाजवळील एका गावातील पीडित मुलीचं लग्न झालं. लग्नानंतर २९ नोव्हेंबर रोजी तिला सासरी नांदायला पाठवण्यात आलं होतं. सासरी गेल्यानंतर सासरच्या मंडळीनं मोठ्या उत्सहात तिचं स्वागत केलं होतं. लग्नाचे विधी पार पडल्यानंतर सायंकाळी अचानक तिची प्रकृती बिघडली. त्यामुळे तिच्या पतीनं तिला कोणतं तरी औषध दिलं. हे औषध प्यायल्याने तिला गुंगी आली. बेशुद्धावस्थेत असताना हनिमूनच्याच दिवशी आरोपी पतीसह त्याच्या मित्रांनी नवविवाहितेवर आळीपाळीने बलात्कार केला. त्यामुळे पीडितेची प्रकृती आणखीच खालावली. त्यानंतर सासरच्या मंडळींनी पीडितेला रुग्णालयात दाखल करत रुग्णालयातून पळ काढला आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर, पीडित मुलीच्या वडिलांनी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेची सत्यता पडताळल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.
नवविवाहित पीडित महिलेच्या अंतर्गत भागात दुखापत झाल्याची पुष्टी तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी केली आहे. तसेच तिच्या शरीरावर मारहाण झाल्याच्या खूणा आढळल्याची माहिती देखील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. यासोबतच पीडितेच्या गर्भाशयाला देखील दुखापत झाल्याचा संशय डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे पीडितेचा अल्ट्रा साउंड चेकअप करण्यात येणार असल्याची माहिती महिला डॉक्टरांनी दिली आहे.