जयपूर (वृत्तसंस्था) लग्न झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नवरीनं संपूर्ण कुटुंबाला जेवणातून विष (newlywed bride give poison to whole family) दिलं. तसेच घरातील सर्व दागिने, रक्कम आणि मोबाइल घेऊन पळ काढला. शेजारी राहणाऱ्या नागरिकांना हा धक्कादायक प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या मदतीनं सर्व कुटुंबीयांना रुग्णालयात दाखल केलं. संबंधित घटना राजस्थानच्या जयपूर जिल्ह्यातील कोटपूतली येथील आहे.
येथील कृष्णा टॉकीज परिसरातील पटवा गल्लीत राहणाऱ्या एका कुटुंबातील मुलाचं २२ फेब्रुवारी रोजी लग्न झालं होतं. कोटपूतली येथील लक्ष्मी नारायण मंदिरात हे लग्न पार पडलं होतं. लग्न झाल्यानंतर नववधू पूजा आनंदानं पतीसोबत नांदायला गेली होती. पण लग्नानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी रात्री वधू पूजानं सर्वांसाठी जेवण बनवलं. घरातील सर्वांना हे जेवण खाऊ घातलं. पण तिने स्वतः अन्नाचा एक कणही खाल्ला नाही.
कुटुंब बेशुद्ध होताच नवरीने दागिन्यांसह रोख रक्कम घेऊन काढला पळ
रात्री जेवण केल्यानंतर संपूर्ण कुटुंब बेशुद्ध पडलं. याची संधी साधून आरोपी नवरीनं घरातील सर्व दागिने, रोख रक्कम आणि मोबाइल फोन घेऊन पळ काढला आहे. शनिवारी सकाळी उशिरापर्यंत घरातील कोणताच सदस्य घराबाहेर दिसला नाही. त्यामुळे शेजाऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता, पोलीसही हादरून गेले. यानंतर पोलिसांनी तातडीनं कुटुंबातील सर्वांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. सुदैवाची बाब म्हणजे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
नवरीनं हा जीवघेणा खेळ खेळला
नवरदेवाचे वडील नंदू पटवा यांनी सांगितलं की, ‘हे लग्न एका मध्यस्थाच्या माध्यमातून झालं होतं. त्याबदल्यात मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तीला दीड लाख रुपये देण्यात आले होते. पण लग्नानंतर दुसऱ्याचं दिवशी आरोपी नवरीनं हा जीवघेणा खेळ खेळला आहे. या प्रकरणी कोटपूतली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपी नवरी पूजाची माहिती काढली जात आहे. तिचं नाव आणि घराचा पत्ता देखील चुकीचा असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली आहे. पोलीस सध्या लग्नात मध्यस्थीची भूमिका बजावणाऱ्या इतर लोकांची चौकशी करत आहेत.