धरणगाव (प्रतिनिधी) जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करत शहरातील हॉटेल बाबलामध्ये दिवसभर सर्रास मद्यविक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार मागील काही दिवसांपासून सुरु आहे. विशेष म्हणजे या हॉटेलच्या जवळच कोरोनाचे नियम न पाळणाऱ्या नागरिकांविरुद्ध कारवाईसाठी पोलीस, महसूल आणि नगरपालिकेचे पथक दिवसभर थांबून असतात. प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी वर्गाला येथूनच मद्यपुरवठा होत असल्यामुळे सर्व विभाग या हॉटेलकडे दुर्लक्ष करत असल्याचीही चर्चा गावात सुरु आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मद्यविक्रीसाठी ‘होम डिलिव्हरी’च्या बाबतीत काढलेल्या आदेशानुसार या हॉटेलची तपासणी केल्यास अनेक गैरप्रकार उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लॉकडाउनच्या काळात थेट मद्यविक्रीला बंदी असतानाही धरणगावातील हॉटेल बाबलामध्ये तिप्पट दराने बेकायदा पद्धतीने मद्य विक्री सुरू आहे. ‘लॉकडाउन’च्या काळात फक्त जीवनाश्यक वस्तूंची दुकाने सुरू आहेत. तर इतर व्यवसायिकांना फक्त ११ वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी आहे. दुसरीकडे मात्र, हॉटेल बाबलामध्ये मोठ्या प्रमाणात मद्य विक्री करण्यात येत आहे. मद्यविक्री करण्यासाठी हॉटेल बाबलाने नामी शक्कल लढवली आहे. बिअरबारचे शटर अर्धे उघडून आम्ही होम डिलिव्हरीचा देखावा निर्माण केला जातो. वास्तविक बघता या हॉटेलच्या आजूबाजूला कोपऱ्यात दोन-तीन कर्मचारी असतात. दारू घेण्यासाठी ग्राहक आल्यास त्याच्याकडून आधी पैसे घेऊन एक कर्मचारी दुकानात जातो आणि त्याला दारू आणून देतो. सकाळी आणि संध्याकाळी तर याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. दुसरीकडे इतर वेळी शंभर रुपयांना मिळणारी दारूची बाटली विक्रेत्याला २०० रुपयांना देतो आणि तो विक्रेता ग्राहकाला ३०० ते ३५० रुपयांना विकतो. या हॉटेलच्या परिसरात बनावट दारू विक्रेत्यांचेही फावले असून, त्यांच्याकडून अनेक नामांकित कंपन्यांची बनावट दारू बाजारात उपलब्ध होताना दिसत आहेत.
‘या’ अटींवर आहे घरपोच दारूविक्रीची परवानगी !
१) कन्टेन्मेंट झोनमध्ये घरपोच सेवा दिली जाणार नाही. २) परवानाधारक मद्यविक्री दुकानदारांनाच घरपोच दारू देता येणार आहे. ३) नमूद केलेल्या दिवशी आणि वेळेवर परवानाधारक विदेशी मद्याची विक्री आणि वितरण केवळ त्याच्या परिसरात करेल. ४) परवानाधारकानं संबंधित मद्याच्या विक्रीसाठी मागणी नोंदवली असेल तरच, त्याला दारूची विक्री परवानाधारकाच्या निवासी पत्त्यावर करता येईल. ५) घरपोच सेवा देणारे डिलिव्हरी बॉय मास्कचा वापर, वेळोवेळी हाताचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी हँड सॅनिटायझरचा वापर करतील याची खबरदारी परवानाधारक घेतील. ६) डिलिव्हरी बॉयजवळ कोरोना बाधित नसल्याचा आरटीपीसीआरचा अहवाल असणे, बंधनकार आहे. ७) डिलिव्हरी बॉयजवळ एफएलएक्सचा परवाना असणे देखील आवश्यक आहे. यासह अनेक महत्वपूर्ण नियम घरपोच दारूविक्रीसाठी घालून देण्यात आली आहेत.
नियमांचे सर्रास उल्लंघन
हॉटेलमध्ये प्रशासनाच्या डोळ्यासमोर एवढ्या मोठ्या प्रमाणात नियमांचे उल्लंघन होत असतांना देखील हॉटेल बाबलावर कुठलीही कारवाई होत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी वर्गाला येथूनच मद्यपुरवठा होत असल्यामुळे सर्व विभाग या हॉटेलकडे दुर्लक्ष करत असल्याचीही चर्चा गावात सुरु आहे. एवढेच नव्हे तर छोट्या मोठ्या व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारणारे अधिकारी या हॉटेलवर कारवाई करतांना मात्र, कचरतात. त्यामुळेआदेशानुसार या हॉटेलची तपासणी केल्यास अनेक गैरप्रकार उघडकीस येतील, असे बोलले जात आहे.